Instagram Reels Inspired Crime Sarkarnama
देश

Shocking Crime Story : ऐकावं ते नवलच! 3 मित्रांना चढलं करोडपती होण्याचं भूत, Reels बघून असा कट रचला की पोलीसही चक्रावले!

Shocking crime story inspired by social media reels : रील्स पाहून केलेल्या धक्कादायक कृत्याची माहिती मिळताच पोलीस घरी पोहोचले. या प्रकरणात कारवाई होऊन आरोपीला जेलमध्ये जावे लागले.

Rashmi Mane

आजच्या सोशल मीडिया युगात Instagram Reels आणि YouTube वर दिसणाऱ्या व्हिडीओंचा तरुणांवर मोठा प्रभाव पडतो. मात्र, व्हिडीओ पाहून एखादी गोष्ट प्रत्यक्ष आयुष्यात करण्याचा प्रयत्न केला आणि तो कायद्याच्या कचाट्यात सापडला, तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. हैदराबादमध्ये याचाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

करोडपती होण्याच्या हव्यासापोटी 3 मित्रांनी चक्क बनावट नोटा छापण्याचा धंदा सुरू केला. विशेष म्हणजे, बनावट नोटा तयार करण्याची कल्पना त्यांना सोशल मीडिया व्हिडीओमधून मिळाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

बनावट नोटा छापणारे 3 जण अटकेत

हैदराबाद पोलिसांनी बनावट भारतीय चलनी नोटा तयार करून त्या बाजारात चलनात आणल्याच्या आरोपावरून 3 जणांना अटक केली आहे. कमिश्नरच्या टास्क फोर्स, शमशाबाद झोन टीम आणि बालापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही टोळी पकडली. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 2.91 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्यांची नावे रामावत रामू (36), रामावत मोतीलाल (35) आणि रामावत गांधी (19) अशी आहेत. तिघेही वड्डीपटला येथील चिंथल थांडा परिसरातील रहिवासी आहेत. रामू हा फूड डिलिव्हरीचे काम करतो, तर मोतीलाल बाइक टॅक्सी चालवतो. गांधी ऑटो रिक्षा चालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रील्स पाहून बनावट नोटा तयार करण्याची कल्पना

पोलिसांच्या तपासानुसार, रामू आणि मोतीलाल यांनी YouTube आणि Instagram वरील व्हिडीओ पाहून बनावट नोटा तयार करण्याची पद्धत शिकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोतीलालला YouTube वर बनावट नोटांशी संबंधित एक नोटिफिकेशन मिळाले. शमशाबाद झोन टास्क फोर्सचे इन्स्पेक्टर डी. कृष्ण मोहन यांच्या माहितीनुसार, त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या फोन नंबरवर आरोपींनी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना बनावट नोटा तयार करण्यासाठी आवश्यक साहित्याबाबत माहिती देण्यात आली.

कलर प्रिंटर, स्कॅनर आणि बॉन्ड पेपरचा वापर

आरोपींनी कलर प्रिंटर, स्कॅनर आणि बॉन्ड पेपरसह इतर साहित्य खरेदी केले. त्यानंतर घरातूनच बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली. नोटा हुबेहुब खऱ्या दिसाव्यात यासाठी त्यांनी अस्सल नोटांवरील वॉटरमार्कची नक्कल करण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी या बनावट नोटा प्रामुख्याने दारूची दुकाने आणि भाजी मंडईमध्ये वापरत होते. रात्रीच्या वेळी कमी रकमेच्या व्यवहारांमध्ये या नोटा वापरल्या जात असल्याने सहज संशय येणार नाही, असा त्यांचा अंदाज होता.

2.91 लाखांच्या बनावट नोटा जप्त

पोलिसांनी आरोपींकडून 500 रुपयांच्या 437 बनावट नोटा, 100 रुपयांच्या 648 बनावट नोटा आणि 200 रुपयांच्या 39 बनावट नोटा जप्त केल्या. या सर्व नोटांची एकूण किंमत 2 लाख 91 हजार 100 रुपये आहे. याशिवाय 500 रुपयांच्या 4 आणि 100 रुपयांच्या 4 अस्सल नोटाही पोलिसांना मिळाल्या. या नोटांचा वापर बनावट नोटा तयार करण्यासाठी नमुना म्हणून केला जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

या प्रकरणात सुधीर जॉन चेला उर्फ वामशी नावाचा आणखी एक व्यक्ती सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे. तो सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेले साहित्य आणि बनावट नोटा पुढील तपासासाठी बालापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT