Congress President Election
Congress President Election sarkarnama
देश

Rajasthan : गेहलोत सरकार कोसळणार ; 82 आमदारांचे राजीनामे, मुख्यमंत्री होण्याचे पायलटांचे स्वप्न भंगणार ?

सरकारनामा ब्युरो

जयपूर :कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी (Congress President Election) राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे रिंगणात उतरणार आहेत. गेहलोत हे काँग्रेस अध्यक्ष झाले तर सचिन पायलट मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, अशी शक्यता आहे, त्यामुळे राजस्थान कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे.

राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांची निवड करण्याचा पक्ष श्रेष्ठींचा विचार आहे. पायलट यांना विरोध करणारे गेहलोत यांचे समर्थक 82 आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष सी.पी जोशी यांच्याकडे दिले आहेत. पायलट यांच्या विरोधात वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे.

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे एक व्यक्ती, एक पद यासाठी आग्रही आहेत.त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी गेहलोत यांना राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे, हे पद त्यांनी सोडले पाहिजे असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह आहे. मात्र, ते अशोक गेहलोत आणि त्यांच्या समर्थक आमदारांना मान्य नसल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी रविवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. त्यावेळी तिथे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, अजय माकन आणि माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट हे उपस्थित होते. राजस्थानमध्ये काँग्रेसचे 108 आमदार आहेत.या बैठकीला काँग्रेसचे फक्त २५ आमदार हजर होते. त्यामुळे पायलट यांच्या विरोधात वातावरण तापल्याचे सर्वांना पाहायला मिळाले.

बहुतांश आमदार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे समर्थन करणारे असल्याचे रविवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकी दिसून आले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकी आधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशींच्या निवसस्थानी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांना चर्चेसाठी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींनी दिल्लीला बोलावले आहेत. पक्षातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे.

गेहलोत यांच्या मर्जीतील व्यक्ती मुख्यमंत्री होणार नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे, कारण पुढच्या वर्षी राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मुख्यमंत्रीपदाची माळ सचिन पायलट यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे. गेहलोत यांच्या मर्जीतील व्यक्तीला मुख्यमंत्री केले तर पायलट गटातील नाराजीचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्यासाठी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी गेहलोत यांच्या मर्जीतील व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याचे धाडस करणार नाही,अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT