Sanjay Singh sarkarnama
देश

राजकारण तापले : 'आप'चे संजय सिंह अखेर राज्यसभेतून निलंबित

बरोबर एका वर्षापूर्वी वादग्रस्त कृषी कायद्यावरील गदारोळानंतर राज्यसभेतील (RajyaSabha) १३ खासदारांना निलंबित केले होते.

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : सर्वपक्षीय खासदारांची वर्दळ, सरकारच्या दडपशाहीविरूध्द जोरदार घोषणाबाजी, निलंबित केलेल्या खासदारांचे क्रांतीकारी गाण्यांचे सूर, असा वातावरणाने ऐतिहासिक संसद भवनाच्या (Parliament House) प्रांगणातील राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा पुतळा पुन्हा गजबजला आहे. राज्यसभेतील २० खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ गांधी पुतळ्यासमोर या खासदारांनी आज ५० तासांचे सत्याग्रह आंदोलन सुरू केले. दरम्यान, पीठासीन अधिकाऱ्यावर कागद भिरकावण्याच्या बेशिस्त कृतीबद्दल आम आदमी (App) पक्षाचे संजय सिंह (Sanjay Singh) यांनाही आज या आठवडयासाठी निलंबित करण्यात आले. यामुळे दोन्ही सदनांतील निलंबित खासदारांची संख्या २४ वर पोचली आहे. (Sanjay Singh Latest Marathi News)

बरोबर एका वर्षापूर्वी वादग्रस्त कृषी कायद्यावरील गदारोळानंतर राज्यसभेतील १३ खासदारांना निलंबित केले होते. तेव्हाही संपूर्ण अधिवेशन असेच वातावरण या परिसरात होते. सर्वपक्षीय खासदारांच्या वर्दळीने हा परिसर जिवंत भासत असे व आजही तेच चित्र तेथे दिसले. काल निलंबित केलेले १९ व आज त्यात भर पडलेले संजय सिंह यांनी गांधी पुतळ्यासमोर ठाण मांडले.

मोदी-शहा यांनी भारताच्या लोकशाहीलाच सस्पेंड (निलंबित) केले आहे. तुम्ही २४ खासदारांच्या निलंबनाचे काय घेऊन बसलात, असा सवाल तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी उपस्थित केला. मात्र, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांच्या एकीला पडलेल्या भेगा आंदोलनातही दिसून येत आहेत. राज्यसभेचे खासदार गांधी पुतळ्यापाशी बसले आहेत. लोकसभेतून निलंबित केलेल्या काँग्रेसच्या ४ खासदारांनी संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे अनेक काँग्रेसचे नेते व खासदार मुख्यतः तिकडे जाताना दिसत होते.

राज्यसभेत आजही सकाळच्या सत्रातील कामकाज स्थगित करण्यात आले. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) ईडी (ED) कारवाईच्या निषेधार्थ आज काळा फेटा बांधून सभागृहात आले होते. शून्य तासाच्या सुरवातीला सभापती वेंकय्या नायडू यांनी सुरवातीचे निवेदन वाचण्यास सुरवात केली, तोच संजय सिंह यांनी महागाई व जीएसटीवर आवाज उठवला. संतप्त झालेले नायडू यांनी, हा बेशिस्तपणाचा कळस आहे. तुम्ही हेच वर्तन कायम ठेवणार असाल तर मी सभागृहाची कारवाई दुपारी १२ पर्यंत स्थगित करतो, असे सांगून तशी घोषणा केली.

यावेळी सभागृहात गदारोळ सुरू झाला नव्हता. त्यानंतर संजय सिंह यांना निलंबित केल्याची सूचना सचिवालयाकडून जारी करण्यात आली. त्यांनी काल दुपारी चार वाजता पीठासीन अधिकारी भुवनेश्वर कलिता यांच्या अंगावर कामकाज सुरू असताना कागदाचे तुकडे भिरकावले होते. दरम्यान, राज्यसभेत १९ खासदारांचे निलंबन व काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीमुळे खासदारही संसद चालू देण्याच्या मनस्थितीत नाहीत. साहजिकच दुसराही आठवडा गोंधल व गदारोळानेच गाजणार हे स्पष्ट झाले आहे.

भाजप-हा सत्याग्रह नव्हे!

सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमुळे काँग्रेस (Congress) नेत्यांनी सत्याग्रहाच्या नावाखाली आंदोलन, जाळपोळ यासारखे जे प्रकार सुरू केले आहे, तो सत्य लपविण्याचा निंद्य प्रयत्न आहे, असा प्रतिहल्ला भाजपने चढविला आहे. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले की एका कुटुंबाला भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी सारे काँग्रेस नेते देशभर तपास संस्थांचा विरोध करत आहेत. गांधी घराणे कायद्याच्या व घटनेच्याही वर आहे असे काँग्रेसला वाटते.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विचारले की जर गांधी कुटुंबीयांनी भ्रष्टाचार केला नसेल तर काँग्रेसचे लोक चौकशीला का घाबरत आहेत. काँग्रेसचे मुख्यमंत्री आपापली राज्ये वाऱ्यावर सोडून एका कुटुंबाला वाचवायला दिल्लीत तळ ठोकून बसले हे दुर्देवी असल्याचेही ठाकूर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT