Sonu Sood, Malvika Sood
Sonu Sood, Malvika Sood Sarkarnama
देश

पाठलाग करत सोनू सूदची गाडी जप्त; घरातच थांबण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

सरकारनामा ब्युरो

मोगा : पंजाब विधानसभेच्या (Punjab Election 2022) 117 जागांसाठी रविवारी मतदान सुरू असतानाच बॉलीवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याच्या अडचणी वाढल्या आहेत. मोगा मतदारसंघातून त्याची बहीण मालविका (Malvika Sood) या काँग्रेसच्या (Congress) उमेदवार आहेत. या मतदारसंघात मतदानादिवशी मतदान केंद्रांवर जाणं सोनू सूदला भोवलं आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची गाडी जप्त केली आहे. तसेच विरोध पक्षांकडूनही आयोगाकडं त्याच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

मोगा (Moga) मतदारसंघातील लंडेके जावात जात असताना अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. शिरोमणी अकाली दलाचे पोलिंग एजंट दीदार सिंग यांनी आयोगाकडे त्याची तक्रार केली आहे. सोनू सूदकडून मतदारांवर प्रभाव टाकला जात असल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे. त्यानंतर आयोगाच्या टीमने सोनूच्या गाडीचा पाठलाग करत पाहणी केली. यावेळी तक्रारीतील दाव्यात तथ्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला थांबवण्यात आले.

अधिकाऱ्यांनी सोनू सूदची गाडी जागेवरच जप्त करत त्याला दुसऱ्या वाहनाने घरी पाठवले. तसेच मतदानाची वेळ संपेपर्यंत घरातच थांबण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. तसेच पुढील कारवाईसाठी अधिकाऱ्यांकडून आयोगाला कळवले जाणार आहे. त्यामुळे सोनू सूदच्या अडचणी वाढल्या आहे. तो मागील काही दिवसांपासून मोगामध्ये आपल्या बहिणीचा प्रचार करत आहे.

दरम्यान, सोनू सूदने ही तक्रार फेटाळून लावली आहे. तो म्हणाला, ‘माझ्यावरील आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. मतदारांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव टाकला नाही. मी फक्त समर्थकांकडून मतदानाची माहिती घेत होतो. आम्हाला वेगवेगळ्या मतदान केंद्रावरून माहिती मिळाली की अकाली दलाच्या लोकांकडून काही केंद्रांवर पैसे वाटले जात होते. निवडणूक योग्यप्रकारे पार पडावी, यासाठी त्याची पडताळणी करणे हे आमचं काम आहे. म्हणून आम्ही तिथे गेलो. आता आम्ही घरी आहोत.’

पोलीस उपायुक्त हरीश नायर म्हणाले, ‘सोनू सूदविरोधातील तक्रार खरी असेल तर कडक कारवाई करावी, असं प्रशासनाचं म्हणणं आहे.’ सोनू सूद हा रविवारी सकाळपासूनच बहीण मालविका यांच्यासोबत विविध मतदान केंद्रांवर जाऊन मतदारांना भेटत होते. भाजपचे उमेदवार हरजोत कमल यांच्याशी मालविका यांचा थेट मुकाबला आहे. कमल हे या मतदारसंघातून मागील निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT