actress ankita lokhande slams rhea chakraborty in sushant singh rajput case
actress ankita lokhande slams rhea chakraborty in sushant singh rajput case 
देश

मला सवत अन् विधवा म्हणणाऱ्यांनो, रियालाच ड्रग्जची चटक लागली होती...

वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला अटक केली आहे. रियाचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून, तिची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली. आता या प्रकरणी सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडे हिने रियाला लक्ष्य केले आहे. याचबरोबर सुशांतची हत्या झाली नसल्याचा दावा तिने केला असून, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र पोलीस आणि केंद्र सरकारवर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीने काही कलाकारांना या प्रकरणी नोटीस बजावली असून, यात राकुल प्रीत सिंह, सारा अली खान आणि सिमॉन खंबाटा या तीन अभिनेत्रींना चौकशीसाठी एनसीबीने समन्स बजावले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.  

अंकिताने आज इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये रियावर निशाणा साधला आहे. तिला सवत आणि विधवा संबोधल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. तिने म्हटले आहे की, सुशांतची हत्या झाली असे मी कधीच म्हणाले नव्हते. परंतु, सुशांत आणि त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, असे मला वाटते. रिया एका बाजूला सुशांतच्या प्रकृतीसाठी डॉक्टर आणत होती आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यासाठी ड्रग्जही आणत होती. नंतर तिलाही ड्रग्जची चटक लागल्याने याची माहिती तिने सुशांतच्या कुटुंबीयांना दिली नाही. नैराश्यग्रस्त मित्राला तिने ड्रग्जचे सेवन करण्यापासून रोखले नाही. 

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT