मुंबई : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईकरांना गिफ्ट दिले आहे. आज मोठी घोषणा करत मध्य वैतरणा जलाशयातून १०० मेगावॅट अक्षय ऊर्जानिर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (100 MW Renewable Hybrid Energy plant) त्यामुळे स्वतःचे धरण असलेली आणि स्वतःचे वीज निर्मिती केंद्र असलेली देशातील मुंबई ही एकमेव महापालिका (BMC) असणार आहे. या १०० मेगावॅट प्रकल्पामध्ये २० मेगावॉटचा जल विद्युत प्रकल्प आणि ८० मेगावॉटचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प असणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने २०१४ मध्ये पालघर जिल्ह्य़ात मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावात १०२.४ मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय पूर्ण केले आहे. इथूनच मुंबईकरांना पाणीपुरवठ्यात करण्यात येतो तिथून आता १०० मेगावॅट वीज निर्मिती सुद्धा करण्यात येणार आहे. आज त्यासाठीच्या करारावर दोन्ही बाजूंनी स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar), सभागृह नेत्या विशाखा राऊत उपस्थित होत्या.
खरंतर या धरणाच्या निर्मितीवेळीच जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा तसेच जलविद्युतनिर्मितीसाठी स्वतंत्र जलवाहिनीही टाकण्यात आली होती. त्यानंतर १२ डिसेंबर २०१९ रोजी राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) जलसंपदा विभागाने या जलाशयातून जलविद्युतनिर्मितीसाठी महानगरपालिकेला परवानगी दिली. परवानगी मिळाल्यानंतर महापालिकेनेही तात्काळ पावलं उचलत सल्लागारांची नियुक्ती केली.
मुंबईतील मोठ्या स्वरूपाची विजेची मागणी पाहता 'बांधा-वापरा-हस्तांतरित करा' तत्त्वावर जलविद्युतनिर्मितीसोबत सौरऊर्जा निर्मिती करणे हे अधिक फायदेशीर ठरेल, असा सल्ला संबंधित सल्लागारांनी दिला. पुढे ही शिफारस स्वीकारून महानगरपालिकेने कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्युसर मॉडेलनुसार या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी रिव्हर्स ऑक्शन तत्त्वावर निविदा मागवल्या. नोव्हेंबर २०२० मध्ये ३ कंपन्यांनी निविदा सादर केल्या.
त्यातून कंत्राटदाराची निवड करण्यात येवून प्रकल्पाच्या खर्च काढण्यात आला. त्यानुसार या प्रकल्पाच्या बांधकामासाठी लागणारा ५३६ कोटी रुपयांचा खर्च असून प्रचालन व देखभालीचा खर्च २५ वर्षांसाठी कंत्राटदाराकडेच राहणार आहे. मात्र या प्रकल्पाद्वारे निर्माण होणारी विद्युत ऊर्जा ही राज्य वीज वितरण कंपनीच्या पायाभूत सुविधांमार्फत पालिकेच्या जलप्रक्रिया केंद्रांमध्ये वापरली जाणार आहे. त्यामुळे पालिकेचे दरवर्षी वीज बिलाचे २३ ते २५ कोटी वाचणार आहेत.
वैशिष्ट्ये
* हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प जलाशयातील पाण्यावर आधारित असल्याने त्यासाठी वेगळ्या जागेची आवश्यकता नाही.
* प्रकल्पाचा खर्च जरी विकासक करणार असला तरी प्रकल्पाची मालकी महानगरपालिकेचीच राहणार आहे.
* प्रकल्पातून दरवर्षी सुमारे २०८ दशलक्ष युनिट ऊर्जानिर्मिती
*महानगरपालिकेच्या वीज खर्चात प्रतिवर्षी सुमारे २३ ते २५ कोटी रुपयांची बचत होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.