Babul Supriyo taking oath as MLA  Sarkarnama
देश

राज्यपालांनी टाकला तिढा अन् अखेर 25 दिवसांनी आमदाराला घ्यावी लागली शपथ

राज्यपालांकडून आमदाराच्या शपथविधीवरून सरकारची कोंडी

सरकारनामा ब्युरो

कोलकता : माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी मागील वर्षी भाजपला (BJP) धक्का देत तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना डच्चू देण्यात आल्यानं ते नाराज होते. केंद्रीय मंत्रिपद गमावल्यानंतर त्यांनी लोकसभेच्या खासदारकीचाही राजीनामा दिला होता. त्यांनी नुकताच बालीगंज विधानसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. पण सुप्रियोंना शपथ देण्याचा तिढा राज्यपालांनी निर्माण केल्याने अखेर त्यांना 25 दिवसांनंतर आमदारकीची शपथ देण्यात आली आहे.

सुप्रियो यांना आमदारकीच्या शपथ देण्यावरून मोठा राजकीय गदारोळ उडाला होता. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी या प्रकरणात तिढा निर्माण केला होता. राज्यपालांनी ही शपथ देण्याची जबाबदारी विधानसभेच्या उपाध्यक्षांवर सोपवली होती. परंतु, विधानसभा अध्यक्ष उपस्थित असताना उपाध्यक्षांनी शपथ कशी द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे सुप्रियोंचा शपथविधी रखडला होता. उपाध्यक्षांनी याबाबत राजभवनालाही कळवले होते. अखेर उपाध्यक्षांनी पुढे येऊन सुप्रियोंना शपथ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे 25 दिवसांनी सुप्रियोंनी आमदारकीची शपथ घेतली. या शपथविधीनंतर उपाध्यक्ष म्हणाले की, राज्यपालांनी जाणीवपूर्वक विधानसभा अध्यक्षांना डावलून मला शपथ देण्यास सांगितले. पण आम्ही एकत्रितपणे उभे राहून याला उत्तर दिलं.

बालीगंज मतदारसंघात सुप्रियो यांना 51 हजार 199 मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह हलीम यांना 30 हजार 971 मते तर तिसऱ्या स्थानी असलेल्या भाजपच्या उमेदवार केया घोष यांना 13 हजार 220 मते मिळाली होती. या मतदारसंघात तृणमूलने 49.69 मते मिळवली तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 30.06 टक्के मते मिळाली. केंद्रीय मंत्रिपद, खासदारकी आणि आता आमदारकी असा उलटा प्रवास सुप्रियो यांच्या निमित्ताने बंगालच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.

सुप्रियो यांनी मागील वर्षी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश करणारे ते पाचवे नेते ठरले होते. त्यांच्या आधी 4 भाजप आमदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. सुप्रियो यांच्याकडे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद होते. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. यानंतर दोनच महिन्यांत त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करुन भाजपला धक्का दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT