Devendra Fadnavis | Vinod Tawde Sarkarnama
देश

फडणवीस-तावडेंची कित्येक दिवसांनी गळाभेट; दिल्ली दौऱ्यात दोघांनीही जपला भावनिक बंध

Devendra Fadnavis | Vinod Tawde : दोघांच्या संबंधांमधील कडवटपणा आता विरला असल्याच्या चर्चा

ऋषीकेश नळगुणे

दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी कालपासून महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. याच भेटीगाठी सुरु असताना आज दिल्ली दौऱ्यात महाराष्ट्र सदनात एक अत्यंत भावनिक क्षण बघायला मिळाला. आज अनेक दिवसांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे नेते विनोद तावडे यांची गळाभेट घेतली. त्यामुळे दोघांच्या संबंधांमधील कडवटपणा आता विरला असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडेंचे मैत्रीपूर्ण संबंध अगदी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि युवा मोर्चाच्या दिवसांपासूनचे. ९० च्या दशकात दोघांच्याही राजकारणाची एकत्र सुरुवात झाली. मात्र अलिकडील काळात दोघांच्या संबंधांमध्ये काहीशी कटूता आली असल्याचे चित्र निर्माण झाले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीतून तावडे यांचे तिकीट कापण्यात आले. फटाका दिल्लीहून फुटल्याचे भासवले गेले असले, तरी वात राज्यातूनच पेटवली गेली असल्याचे स्पष्ट दिसत होते.

मात्र त्यानंतरच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जवळपास वर्षभर राजकीय विजनवासात राहिल्यानंत आज विनोद तावडे केंद्रीय राजकारणात सक्रिय झाले असून पक्षाने त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्ष मुख्यमंत्री, नंतर अडीच वर्ष विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी पार पाडून आता नुकतीच राज्याच्या उममुख्यमंंत्री पदाची सूत्र हाती घेतली आहेत. आजच्या दोघांच्या भेटीदरम्यान फडणवीस यांच्या याच त्यागाचे कौतुक करत तावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

विनोद तावडे म्हणाले, पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने दिलेली जबाबदारी अगदी सहज स्वीकारून, कार्यकर्ता वृत्तीने पक्षाच्या हितासाठी सदैव कार्य करत राहण्याची चमकदार कामगिरी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. अशा ओळींसहीत त्यांनी ट्विटरवरुन दोघांचा गळाभेट घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच गप्पा मारताना देखील अत्यंत मोकळ्या वातवरणात दिसून आले. त्यामुळे या भेटीतून दोघांमधील कडवटपणा काहीसा दूर झाल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT