RSS
RSS  Sarkarnama
देश

मोठी बातमी : कोणत्याही मंदिर-मशीद वादात यापुढं संघ उतरणार नाही

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Masjid) सर्वेक्षणावरून सध्या वाद सुरू आहे. य़ा वादावर संघपरिवाराच्या (RSS) बाजूने सूचक व महत्वाचे विधान आले आहे. ‘ज्ञानवापी तसेच यापुढील कोणत्याही मंदिर-मशीद वादात किंवा आंदोलनात संघ अथवा संघपरिवार थेटपणे उतरणार नाही, असे वरिष्ठ संघ सूत्रांनी आज अनौपचारीकरीत्या बोलताना सांगितले. पुढील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘काशी मथुरा बाकी है‘ हा पुढील अध्याय सुरू झाल्याचे वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर थेट संघाच्या बाजूने आलेले हे विधान महत्वाचे मानले जाते.

रामजन्मभूमी -बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल गेल्या वर्षी आला. त्यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिलीत काही पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, रामजन्मभूमी आंदोलनातील एका विशिष्ट स्थितीत संघ दिवंगत सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या काळापासून सक्रियपणे उतरला होता. मात्र, यापुढे मंदिरांवर मशीद उभारण्याच्या घटनांबाबतच्या आंदोलनात संघ प्रत्यक्षपणे सहभागी होणार नाही. त्याची तशी गरजही उरलेली नाही.

ज्ञानवापी मुद्यावर बरीच चर्चा सुरू आहे. मात्र सत्य व तथ्य सर्वांसमोर आले पाहिजे, अशी भूमिका संघनेते सुनील आंबेकर यांनी आज दिल्लीत घेतली. ज्ञानवापी मशिदीतील तळघराच्या खोल्यांत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू संघटनांकडून केला जात आहे. तर ते शिवलिंग नसून मशिदीच्या वजूखान्याला पाणीपुरवठा करण्यासाठी तयार केलेला फवारा आहे, असा दावा मुस्लिम पक्षाने केला आहे.

संघसूत्रांच्या मते वाराणसी, मथुरेसह अनेक ठिकाणी मंदिरे उध्वस्त करून मशिदी बांधल्याचा इतिहास आहे. यातील सत्य परिस्थिती देशासमोर येण्यासाठी न्यायव्यवस्था काम बजावत आहे. यापुढेही न्यायव्यवस्थाच सत्य शोधण्याची भूमिका बजावेल. संघपरिवार यापुढील अशा प्रकारच्या आंदोलनात सक्रियपणे सहभागी होणार नाही. मात्र, ऐतिहासिक सत्य जगासमोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांचे आंदोलन हे स्वयंस्फूर्तीने यापुढे उभे राहील. मात्र, रामजन्मभूमीप्रमाणे अशा ठिकाणांबाबत संघपरिवाराने सक्रिय भूमिका घेण्याची गरज नाही. रामजन्मभूमीचे आंदोलन एका विशिष्ट कालावधीत उभे राहिले होते, असेही सूत्रांनी सांगितले.

जामा मशिदीवर हिंदू महासभेचा दावा

दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीच्या पायऱ्यांचे उत्खनन करावे, अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे. यासाठी महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व शाही इमाम बुखारी यांना पत्रेही लिहिली आहेत. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, जामा मशीद मुळात मंदिर पाडून उभारण्यात आली. या मशिदीखाली अनेक हिंदू देवदेवांच्या मूर्ती आहेत. त्यामुळे या मशिदीच्या पायऱ्या व आवारात खोदकाम करावे. भारतीय पुरातत्व विभागाने यातील सत्य जगासमोर आणावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT