पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या बड्या नेत्यानं मंत्रिपदासह आमदारकीचाही तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यानंतर लगेचच पक्षाच्या एका आमदाराने राजीनामा देत धक्का दिला आहे. आतापर्यंत भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदारांची संख्या आता चारवर गेली आहे. भाजपमधील गळती थांबत नसल्याने पक्ष नेतृत्व धास्तावले आहे. गोव्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आहे.
विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून आमदारांनीही निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. पण या धामधुमीत भाजपला गळती लागली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि घनकचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यानंतर काही तासांतच मायेम मतदारसंघातील आमदार प्रवीण झांटे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते दोघेही भाजप सोडण्याच्या वाटेवर असल्याचे समजते.
मायकल लोबो (Michael Lobo) यांचा उत्तर गोव्यात मोठा दबदबा असल्याचे मानले जाते. त्यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. लोबो यांच्यासोबत रेईस मागोस हे नेतेही भाजपला रामराम करण्याची शक्यता आहे. लोबो हे कलंगुट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. तर मागोस यांना सलीगांव मतदारसंघातून उमेदवारी अपेक्षित आहे. लोबो यांनी अद्याप कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट केलेलं नाही.
आता प्रवीण झांटे यांनीही आमदारकीची राजीनामा दिला आहे. प्रवीण झांटे हे राज्यातील मोठे उद्योगपती आहेत. त्यांचे पिता हे काँग्रेसचे उत्तर गोव्यातील खासदार होते. काँग्रेसने 2012 मध्ये त्यांना तिकिट नाकारले होते. यामुळे मागील विधानसभा निवडणुकीवेळी 2017 मध्ये ते भाजपमध्ये गेले होते. भाजपच्या तिकिटावर ते मायेम मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात (मगोप) प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, गोव्याचे (Goa) नगर विकास मंत्री आणि भाजपचे आमदार मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी मागील महिन्यातच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा सेक्स स्कँडलमध्ये (Sex Scandle) सहभागी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने (Congress) केला होता. त्यानंतर भाजप नेत्या अलिना सलडान्हा (Alina Saldanha) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करत उमेदवारीही मिळवली आहे. त्यांच्यानंतर कार्लोस अल्मेडा या भाजप आमदाराने राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.