Nilesh Rane, Nitesh Rane Sarkarnama
देश

आता निलेश राणेंचाही पाय खोलात; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Sindhudurg Police | Nilesh Rane | Narayan Rane : नारायण राणेंच्या दोन्ही मुलांभोवती पोलिसांच्या कारवाईचा फास आवळला आहे

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना दुहेरी धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांचा मुलगा आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर संतोश परब हल्ला प्रकरणी अटकेची टांगती तलवार असतानाच आता त्यांचा दुसरा मुलगा आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या दोन्ही मुलांभोवती पोलिसांच्या कारवाईचा फास आवळला आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी पत्र लिहून निलेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

जिल्हा पोलिस अधिक्षकांना वैभव नाईक यांनी लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे, १/२/२०२२ रोजी दुपारी ३.०० वा. ओरोस सत्र न्यायालयाच्या बाहेर निलेश नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश असतांना देखील याठिकाणी बंदोबस्ताकरिता तैनात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वत: व त्यांच्या २५ च्या आसपास समर्थकांनी अरेरावी व अर्वाच्या भाषेमध्ये पोलीसांना शिवीगाळ केली. सदर घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण विविध वृत्तवाहिन्यांवरुन प्रसारीत झाले आहे. तरी याबाबत आपण सखोल चौकशी करुन, निलेश नारायण राणे व त्यांच्या समर्थकांविरुद्ध शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणल्याबाबत आणि अर्वाच्च भाषेमध्ये शिवीगाळ केल्याबाबत, गुन्हा दाखल करण्यात यावा.

काल न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला. पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बाजू मांडली होती. न्यायालयाने राणेेंचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांना अटक होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांना अटक करायची की नाही, असा पेच पोलिसांसमोर आहे. कारण त्यांना सर्वोच्च न्यायालयाने शरण येण्यासाठी १० दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे या कालावधीत अटक करायची की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावेळी ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) हे राणेंच्या बाजूने मैदानात उतरले होते.

सिंधुदुर्ग न्यायालयासमोर काल मोठ्या घडामोडी घडल्या. आमदार नितेश राणे हे सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयासमोर हजर झाले. जामीन फेटाळला गेल्यानंतर राणे न्यायालयातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यानंतर नितेश राणे आणि त्यांचे बंधू निलेश राणे यांनी पोलिसांना गाडी अडवण्याचे कारण विचारले. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मला कायदा शिकवू नका, असे म्हणत त्यांनी पोलिसांशी बाचाबाची केली. त्यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आल्याने तणाव निर्माण झाला. यानंतर राणे बंधू थेट वकिलांसमवेत पुन्हा न्यायालयात गेले. नितेश राणे आता जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करणार आहेत.

नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने १० दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर २४ तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. त्यांनी शरण येण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. (Nitesh Rane bail hearing)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT