Mamata Banerjee
Mamata Banerjee Sarkarnama
देश

भाजपपेक्षा तृणमूल वाईट! नेत्यानं पक्ष सोडताना ममतांना आणलं अडचणीत

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीत सुरू आहे. इतर पक्षांचे आमदार फोडून धक्का देणाऱ्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनाच आता मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केलेल्या लव्हू मामलेदार यांनी तीनच महिन्यांत पक्षाला रामराम केला आहे. यामुळे तृणमूल काँग्रेस गोव्यात तोंडावर पडल्याचे चित्र आहे. मामलेदार यांनी पक्ष सोडताना तृणमूलवर बॉम्ब टाकला आहे.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (MGP) माजी आमदार लव्हू मामलतदार (Lavoo Mamledar) यांनी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. ते 2012 आणि 2017 मध्ये विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या प्रवेशाने तृणमूलची गोव्यातील ताकद वाढली होती. आता त्यांनी अचानक तृणमूल सोडून ममतांना मोठा झटका दिला आहे. तृणमूलमध्ये सुरवातीला प्रवेश करणाऱ्या गोव्यातील नेत्यांमध्ये मामलतदार आघाडीवर होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलला यामुळे मोठा फटका बसला आहे.

मामलेदार यांनी तृणमूलवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीआधी हिंदू आणि ख्रिश्चनांमध्ये फूट पाडून पाडण्याची तृणमूलची योजना असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तृणमूलने गृहलक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे. या महत्वकांक्षी योजनेबाबतही मामलेदार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तृणमूल हा भाजपपेक्षा वाईट पक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

मामलेदार म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली झालेल्या तृणमूलच्या प्रभावी कामगिरीमुळे मी पक्षात प्रवेश केला होता. मला आधी वाटत होते की तृणमूल हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. परंतु, मागील 15-20 दिवसांत मी वेगळ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. तृणमूल हा भाजपपेक्षा वाईट पक्ष आहे. तृणमूल हा हिंदू आणि ख्रिश्चन मतदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.

गृहलक्ष्मी योजनेच्या नावाखाली तृणमूल नागरिकांची माहिती गोळा करीत आहे. पश्चिम बंगालमध्ये या योजनेअंतर्गत 500 रुपये महिलांना दिले जातात. गोव्यात मात्र, महिलांना 5 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. एवढी रक्कम देणे अशक्य आहे. नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. तृणमूल हा धार्मिक संघर्ष निर्माण करणारा पक्ष असून, तो गोव्याच्या धर्मनिरपेक्ष वातावरणाला धक्का पोचवत आहे, असेही मामलेदार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT