<div class="paragraphs"><p>Covid Vaccination&nbsp;</p></div>

Covid Vaccination 

 

Sarkarnama

देश

धक्कादायक : कोरोना लशीचे चार डोस घेतलेली महिला 'पॉझिटिव्ह'

सरकारनामा ब्युरो

इंदोर : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराचा धोका आता वाढू लागला आहे. यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. सरकारने कोरोना लशीचा (Covid Vaccine) बूस्टर डोस (Booster Dose) देण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी कोरोना लशीचे चार डोस घेतलेल्या महिलेला संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत.

इंदोर विमानतळावर दुबईला जात असलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. ही 44 वर्षांची महिला दुबईची रहिवासी आहे. विमानतळावर तिची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात ती पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे तिला विमानात जाण्यापासून रोखण्यात आले. तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुबईला या विमानाने जाणारे एकूण 89 प्रवासी पॉझिटिव्ह आढळले आहेत.

विशेष या महिलेने कोरोना लशीचे चार डोस घेतले होते. या महिलेने दुबईत सायनोफार्म आणि फायजरच्या कोरोना लशीचे प्रत्येकी दोन डोस घेतले आहे. तिने ती 12 दिवसांपूर्वी एका नातेवाईकाच्या विवाहासाठी इंदोरमध्ये आली होती. ती परत जात असताना तिची विमानतळावर चाचणी करण्यात आली. यातून ती पॉझिटिव्ह आढळली. तिला मागील काही दिवसांपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता.

दरम्यान, ओमिक्रॉनचा धोका वाढू लागताच सरकारने बूस्टर डोस देण्याची घोषणा केली होती. वैद्यकीय व्यावसायिक, फ्रंटलाईन वर्कर्स आणि विविध व्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. हा डोस 10 जानेवारीपासून दिला जाईल. दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना हा डोस दिला जाणार आहे. याचबरोबर 15 ते 18 वयोगटातील मुलांना 3 जानेवारीपासून कोरोना लस दिली जाणार आहे.

देशात आता 8 कोरोना लशी उपलब्ध झाल्या आहेत. देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, झायकोव्ह-डी, स्पुटनिक व्ही, मॉडर्ना, जॉन्सन्स अँड जॉन्सन, कोर्बेव्हॅक्स आणि कोव्होव्हॅक्स या सहा लशींना परवानगी देण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरासही सरकारने परवानगी दिली आहे. यात आता बायोलॉजिकल-ई कंपनीच्या कोर्बेव्हॅक्स आणि सिरमच्या कोव्होव्हॅक्स लशीचा समावेश करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT