Agneepath Recruitment Scheme | Rajnath Singh News, Tour of duty scheme details Sarkarnama
देश

‘अग्निपथ’ सैन्य भरती योजना : ४ वर्षांत २४ लाख ४३ हजार वेतन अन् निवृत्ती वेतनासारखे फायदे

Agneepath Recruitment Scheme | तरुणांना अनेक आकर्षक लाभ अन् फायदे

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज सर्व विभागांचा आढावा घेत पुढील दिड वर्षांमध्ये तब्बल १० लाख नोकरभरती करण्याचे आदेश दिले. त्यापाठोपाठ भारतीय सैन्यदलांतील नवीन प्रकारच्या सैन्य भरतीच्या ‘मिशन अग्निपथ’ योजनेची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath singh) यांनी नवी दिल्लीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात केली. या योजनेत भरती झालेल्या तरुणांना ‘अग्निवीर’ असे खास नाव दिले जाणार असून अग्निवीर म्हणून झालेली निवड प्रत्येकी चार वर्षांसाठी असणार आहे. यावेळी लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते. (Agneepath Recruitment Scheme)

राजनाथसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अग्निपथ’ योजनेत दर वर्षी साधारणतः ५० हजार याप्रमाणे प्रत्येकी ४ वर्षांसाठी तरुणांची सैन्यभरती करण्यात येणार आहे. ४ वर्षांनी त्यातील २५ टक्के तरुणांना नियमित लष्करी सेवेत सामावून घेतले जाणार आहे, तर उर्वरित अग्निवीरांना निवृत्तिवेतन मिळणार आहे. जगभरातील अनेक देशांचा अभ्यास करून ही योजना तयार केली आहे. येत्या काळात भारताच्या लोकसंख्येमध्ये तरुणांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असेल आणि या नवीन योजनेमुळे तरुणांना उत्तम प्रतीचा रोजगार उपलब्ध होईल, असेही ते पुढे म्हणाले. (Agneepath Recruitment Scheme)

मागील अनेक वर्षांपासून देशाची संरक्षण प्रणाली मजबूत करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने अनेक पावलं उचलली आहेत. भारतीय लष्कराला जगातील उत्तम लष्कर बनविण्यासाठी अग्निपथ योजना मोठ्या प्रमाणात सहाय्यभूत ठरेल. यामुळे देशाची सुरक्षा मजबूत होईल त्याबरोबरच तरुणांना रोजगाराच्या संधीही वाढतील, असेही राजनाथसिंह म्हणाले.

लष्कराच्या सैनिक व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी या योजनेची प्रेझेंटेशनद्वारे सविस्तर माहिती दिली. भारतीय सैन्याचे सरासरी वय सध्या ३२ वर्षांचे आहे. ‘मिशन अग्निपथ' मुळे ते वय २४ ते २६ वर्षांपर्यंत कमी होईल आणि सैन्यात तंत्रकुशल तरुण सैनिकांचे प्रमाण वाढेल, असे ते म्हणाले. (Agneepath Recruitment Scheme)

४ वर्षांत २४ लाख ४३ हजार पगार जोडीला निवृत्तीवेतन अन् अनेक फायदे

  • प्रत्येकी ४ वर्षांसाठी युवकांची लष्करासह तिन्ही सैन्यदलांत भरती केली जाईल.

  • दर वर्षी किमान ४६ हजार तरुणांची लष्कर भरती होईल.

  • चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर योजनेतील ७५ टक्के सैनिकांना सेवामुक्त केले जाईल. मात्र पुढील काळात सशस्त्र दलांतील विविध भरतीसाठी त्यांना प्राधान्य दिले जाईल.

  • २५ टक्के तरुणांना सैन्यदलांत पुढे सेवेची संधी मिळेल. मात्र जेव्हा सैन्यभरती होईल तेव्हाच या २५ टक्के युवकांना पात्रता निकष पूर्ण केल्यावर सेनेत सामावून घेतले जाईल.

या सैनिकांना वेतन पुढीलप्रमाणे मिळेल -

  • पहिले वर्ष - ३ लाख ६० हजार रुपये वार्षिक (हाती येतील - २ लाख ५२ हजार) / प्रतिमहिना - ३० हजार रुपये (हाती येतील - २१ हजार रुपये)

  • दुसरे वर्ष - ३ लाख ९६ हजार रुपये वार्षिक (हाती येतील - २ लाख ७७ हजार २००) / प्रतिमहिना - ३३ हजार रुपये (हाती येतील - २३ हजार १०० रुपये)

  • तिसरे वर्ष - ४ लाख ३२ हजार रुपये वार्षिक (हाती येतील - ३ लाख ६ हजार ९६०) / प्रतिमहिना - ३६ हजार रुपये (हाती येतील - २५ हजार ५८० रुपये)

  • चौथे वर्ष - ४ लाख ८० हजार रुपये वार्षिक (हाती येतील - ३ लाख ३६ हजार ) / प्रतिमहिना - ४० हजार रुपये (हाती येतील - २८ हजार रुपये)

अशा पद्धतीने ४ वर्षांमध्ये १६ लाख ६८ हजार रुपये वेतन मिळणार असून त्यात ११ लाख ७१ हजार ९६० रुपये हाती येणार आहेत. तर ४ वर्षांत वेतनातून जेवढी कपात केली जाईल तेवढीच रक्कम सरकार कॉर्पस फंडात टाकणार आहे. त्यातून ४ वर्षांनंतर एकत्रितपणे सेवामुक्त होणाऱ्या प्रत्येक सैनिकांना प्रत्येकी ११ लाख ७१ हजारांचे ‘सेवा निधी’ पॅकेज दिले जाणार आहे. असे मिळून एकूण ४ वर्षांत २४ लाख ४३ हजार पगार त्याच्या जोडीला निवृत्तीवेतनाचा लाभ अन् अनेक फायदे मिळणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT