चेन्नई : तमिळनाडूच्या (Tamil Nadu) माजी मुख्यमंत्री जयललिला (Jayalalithaa) यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला (V.K.Sasikala) यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे. शशिकलांचे आता जोरदार कमबॅक होण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर अण्णाद्रमुकचे (AIADMK) समन्वयक व माजी मुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांचे बंधू ओ. राजा यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शशिकलांची भेट घेतली होती. आता पक्षाने राजा यांच्यासह 30 पदाधिकाऱ्यांना दणका देत त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
शशिकलांचा सध्या तमिळनाडू दौरा सुरू आहेत. त्या राज्यभरात अण्णाद्रमुकचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. शशिकला या थोटूकुंडी विमानतळावर पोचल्या आणि तेथून त्या पदाधिकाऱ्यांना भेटत तिरुचेंदूर येथे आल्या. तिथे ओ.राजा आणि अण्णाद्रमुकच्या पदाधिकाऱ्यांनी शशिकलांची भेट घेतली. या वेळी शशिकला आणि राजा यांची 25 मिनिटे बैठक झाली. या भेटीची माहिती बाहेर येताच पक्षाच्या वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. अखेर राजा यांच्यासह थेनी जिल्ह्यातील 30 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. विशेष म्हणजे राजा यांचे बंधू व माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनीच दोन दिवसांपूर्वी शशिकला यांना पक्षात परत घेण्याचा ठराव मांडला होता.
शशिकलांसह दिनकरन यांना पुन्हा पक्षात घेण्याचा ठराव
शशिकला आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही. दिनकरन यांना पुन्हा अण्णाद्रमुकमध्ये घ्यावे, असा ठराव अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी नुकताच मांडला होता. पक्षाच्या थेनी येथे झालेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. खुद्द पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला. राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत अण्णाद्रमुकला पराभवाचा धक्का बसला आहे. अण्णाद्रमुकचे दोन गट असून, पनीरसेल्वम गट आता शशिकलांच्या मागे उभा राहिला आहे. माजी मुख्यमंत्री एडापाडी पलानीस्वामी यांचा गट आता यावर काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागले आहे. यामुळे शशिकला लवकरच पक्षात परतून सूत्रे हाती घेतील, असे संकेत मिळत आहेत.
जयललितांना पक्ष कार्यकर्ते अम्मा तर शशिकलांनी चिन्नम्मा असे संबोधत. जयललितांच्या मागे शशिकला या कायम सावलीसारख्या असत. जयललितांच्या निधनानंतर शशिकलांनी पक्षासह सरकार ताब्यात घेतले होते. परंतु, त्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शिक्षा भोगण्यासाठी तुरूंगात जावे लागल्यानंतर त्यांच्या हातातून पक्ष आणि सरकार निसटले होते. शशिकला यांनी गेल्या वर्षी 3 मार्चला राजकारणातून निवृत्ती घेतली होती. आता त्या पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. त्यांनी राज्यभरात दौरा सुरू केला असून, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्या भेटत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.