नवी दिल्ली - लखीमपूर खीरी शेतकरी हत्याकांड प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी (Ajay Mishra) हे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या मुलाच्या गाडीखाली या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) मधील घटना ही पूर्वनियोजित कट असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. अशातच त्यांचा एका पत्रकारासोबत शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
त्यामुळेच त्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवला आहे. भाजपचे जेष्ठ नेतेही या प्रकरणात मिश्रा यांचा राजीनामा घेण्याच्या बाजूने असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सध्याच हा राजीनामा घेवू नये असाही एक मतप्रवाह भाजपच्या गोटात असल्याची निश्चित माहिती सकाळ माध्यम समुहाला मिळाली आहे. केवळ विरोधकांच्या दबावाला बळी न पडता सध्याचा गदारोळ थोडा थांबला की मिश्रा यांनी स्वतःच 'इदं न मम्' म्हणून राजीनामा द्यावा, असा मध्यम मार्ग घेण्याच्या विचारापर्यंत भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्व आले आहे अशीही माहिती आहे.
अजय मिश्रा यांनी काल पत्रकारासोबत शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले होते. गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी त्यांना काल चांगलेच फटकारले. मात्र विरोधकांचा संसदीय गदारोळ सुरू असेपर्यंत मिश्रांवर कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता नाही, असेही पक्षनेते सांगतात. संसदीय अधिवेशनही पूर्ण काळ चालेल, रोज या, आणि परत जा हेच विरोधकांबाबतचे धोरण आहे असे भाजपचे राज्यसभेतील प्रतोद शिवप्रताप शुक्ला (Shivpratap Shukla) यांनी सांगितले.
काही वर्षांपूर्वी माजी खासदार कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांच्यावर आरोप होताच त्यांचे वडील आणि तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम (P. Chidambaram) यांच्यावर राज्यसभेत बहिष्कार घालणाऱ्या भाजपने टेनी यांच्या मुद्यावर मात्र "मुलाच्या गुन्ह्याची शिक्षा पित्याला का द्यायची?" अशी कोलांटउडी मारली आहे. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात मंत्री मिश्रा यांच्याइतकाच गुन्हेगारी इतिहास असलेल्या बाबूसिंह कुशवाहा यांना भाजपने वाजत गाजत पक्षात घेतल्यावर मोठा गदारोळ झाला होता. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मध्यस्थी करून असाच मध्यम मार्ग निवून कुशवाहा यांना स्वतःलाच राजीनामा पत्र पाठविण्यास सांगितले होते असे पक्षनेते सांगतात.
लखीमपूर खिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून निकाल येईपर्यंत थांबण्यास विरोधक तयार नाहीत व यांना फक्त संसदेत गदारोळ करायचा आहे असे संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. दरम्यान गृहमंत्रालयात मिश्रा यांच्याकडील महत्वाच्या फायली आधीच काढून घेण्यात आलेल्या असून चार दिवस त्यांना ईशान्य भारताच्या दौऱ्यावर जाण्यास सांगण्यात आले आहे. मात्र सोमवारी होणाऱ्या सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) वर्धापनदिन सोहळ्याला मिश्रा यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावल्याचा वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसल्याने त्या कार्यक्रमालाही जाऊ नका, असे त्यांना सांगितले जाईल असे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.