New Delhi : बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. याचवेळी उत्तर प्रदेशातही दोन आरोपींचे एन्काऊंटर करण्यात आले आहेत. त्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी निशाणा साधला आहे.
प्रियांका गांधी यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करून योगी सरकारलाही घेरलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, हत्या, हिंसा आणि आयुष्य हिसकावून घेण्यासाठीचे राजकीय कायदे, बुलडोझरचा कायदा... याचा संविधान आणि न्यायाशी कसलेही देणेघेणे नाही.
राजकीय वर्चस्व आणि भीतीचे साम्राज्य निर्माण करण्यासाठीच्या कारनाम्यांना कायदा-सुव्यवस्थेचे नाव देणे, हा संविधानाचा अपमान आहे. कायदा-सुव्यवस्था समाजाता शांती प्रस्थापित करण्यासाठी, आरोपींना दंड करण्याठी आणि प्रत्येक नागरिकाला जगण्याची संधी देण्याच्या आधारावर टिकलेली असते. काही अपवाद वगळून कोर्टाच्या आदेशाशिवाय घेतलेला जीव केवळ आणि केवळ हत्या आहे, अशी टीका प्रियांका गांधींनी केली आहे.
उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, बातम्यांमध्ये आलेल्या माहितीनुसार मागील सात वर्षात उत्तर प्रदेशात जवळपास 13 हजार एन्काऊंटर झाले आहेत. यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुधारली का, असा सवाल प्रियांका यांनी केला आहे.
गुन्हे तर थांबत नाही. मग एन्काऊंटरचा उद्देश काय आहे? हा खेळ कशासाठी खेळला जात आहे. हे असंविधानिक काम बंद व्हायला हवे. एवढ्या एन्काऊंटरबाबत प्रश्नचिन्ह आणि संशय उपस्थित केला जात आहे, त्या प्रत्येकाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही प्रियांका गांधी यांनी केली आहे.
दरम्यान, विरोधकांकडून अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित शाळा व्यवस्थापनातील विश्वस्तांना वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काऊंटर केल्याचा दावा खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी केला आहे. विशेष म्हणजे हे आरोपी अजूनही फरार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.