Rajsthan Politics |Bharat Jodo Yatra  
देश

भारत जोडो यात्रेचा असाही परिणाम; मतभेद विसरुन गेहलोत-पायलट पुन्हा एकत्र

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते

सरकारनामा ब्युरो

Bharat Jodo Yatra | राजस्थान काँग्रेसमधील (Congress) गद्दारीच्या वादानंतर भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट अनेक महिन्यांनी एकाच मंचावर पहायला मिळाले. काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस वॉर रूममध्ये बैठक पार पडली. बैठकीनंतर या दोघांनीही एकत्रच मीडियाशी संवाद साधला. राजस्थानमध्ये आम्ही सर्व एकजूट आहोत, आम्ही दोन्ही नेते पक्षाची संपत्ती आहोत आणि ते दोघे मिळून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा यशस्वी करू, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री गेहलोत यांनी व्यक्त केला.

तर, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे राजस्थानमध्ये पूर्ण उत्साहात आणि ताकदीने स्वागत केले जाईल. राजस्थानात ही यात्रा १२ दिवस असेल. या यात्रेत राज्यातील सर्व समाजातील लोक सहभागी होतील. राहुल गांधींचा दौरा ऐतिहासिक ठरेल, असे म्हणत सचिन पायलट म्हणाले की, राजस्थानमधील भारत जोडो यात्रा सकारात्मक संदेश घेऊन जाणार असून, झालावाडमध्ये राहुल गांधींचे जंगी स्वागत करण्यात केले जाईल. राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे भाजप चिंताग्रस्त झाली असून त्यांच्याकडे काही बोलायला काहीच राहिले नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.याचवेळी आमण सर्वजण मिळुन भारत जोडो यात्रा यशस्वी करु, असे आवाहन पायलट यांनी राजस्थानातील जनतेला केले.

मुख्यमंत्री गेहलोत भारत जोडो यात्रेबाबत म्हणाले की, भारत जोडो यात्रेत राहुल गांधी महागाई, बेरोजगारी यासह अनेक मुद्द्यांवर देशात उतरले असून, त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत होत आहे. या यात्रेने देशाच्या आत सुरू असलेल्या आव्हानांविरुद्ध वातावरण तयार केले आहे. एकजुटीचा संदेश देताना गेहलोत यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला की, राहुल गांधींनी जेव्हा आम्हा दोन्ही नेत्यांना संपत्ती म्हणून संबोधलं आहे तर सर्वांनी नेत्याचा संदेश स्वीकारणे हा आमच्या पक्षाचा नियम आहे. त्यामुळे आता आमच्यासमोर २०२३ चे आव्हान आहे आणि आम्ही सर्व एकजुटीने निवडणूक लढवू, असही गेहलोत यांनी म्हटलं.

दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात असून तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमधील प्रवास पूर्ण केल्यानंतर आता ही भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात पोहोचली आहे. मध्य प्रदेशातून ही यात्रा लवकरच राजस्थानमध्ये प्रवेश करणार आहे. पण त्यापुर्वीच राजस्थानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेसची चिंता वाढली होती.अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद टोकाला गेले होते पण गेहलोत आणि पायलट यांच्या एकजूटीने काँग्रेस आणि राहुल गांधी यांची चिंता नक्कीच कमी झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT