Amarinder Singh File Photo
देश

काँग्रेसमध्येच राहण्याच्या मुद्द्यावर कॅप्टन अमरिंदरसिंगांचा मोठा खुलासा

कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यामुळे पंजाबमधील राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) पदावरून हटवल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेस (Congress) विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यामुळे पंजाबमधील राजकीय वातावरण तापले आहे. कॅप्टन यांनी अद्याप पक्ष सोडलेला नसून, त्यांना थांबवण्यासाठी आता काँग्रेस श्रेष्ठींना पावले उचलली आहेत. यावर अखेर अमरिंदरसिंगांनी खुलासा केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन यांनी काँग्रेस सोडू नये, असा पक्ष नेतृत्वाचा प्रयत्न आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनीही कॅप्टन हे पक्षातच राहावेत, अशी भूमिका पक्ष नेतृत्वासमोर मांडली आहे. कॅप्टन यांनी पक्ष सोडू नये, यासाठी नेतृत्वाकडून विविध पर्यायांची चाचपणी केली जात आहे. त्यांनी नवीन पक्ष स्थापन केल्यास मतविभागणी होऊन सर्वाधिक फटका काँग्रेसला बसण्याची भीती नेतृत्वाला वाटत आहे.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडून तिकिट नाकारले अशा उमेदवारांना कॅप्टन त्यांच्या पक्षाकडून संधी देतील, अशी शक्यता आहे. यामुळे काँग्रेसच्या मतांची विभागणी होऊन आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसू शकतो. कॅप्टन यांची मनधरणी करण्याची जबाबदारी काही ज्येष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

यावर कॅप्टन यांच्या वतीने त्यांचे सल्लागार रवीन ठुकराल यांनी खुलासा केला आहे. कॅप्टन यांनी म्हटले आहे की, काँग्रेसमध्येच राहण्याबाबत माझी चर्चा सुरू आहे, हे वृत्त खरे नाही. आता माघारीची वेळ निघून गेली आहे. सोनिया गांधींनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे पण आता काँग्रेसमध्ये थांबणार नाही. कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर तोडगा निघाल्यानंतर माझा नवीन पक्ष भाजप आणि अकाली दलाच्या गटांसोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरू करेल. पंजाब आणि राज्यातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी भक्कम आघाडी उभारण्याची माझी इच्छा आहे.

कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी नव्या पक्षाची घोषणा केली त्यावेळी त्यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिला नसल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती. मी प्रदीर्घ काळ काँग्रेससोबत आहे. आणखी दहा दिवस राहिलो तर काय फरक पडतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. त्यांनी काँग्रेसचा अद्याप राजीनामा न दिल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही कॅप्टनची नवी खेळी तर नाही ना, अशीही शंका व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT