amarinder singh says sonia gandhi said sorry to him
amarinder singh says sonia gandhi said sorry to him 
देश

सोनिया गांधी मला म्हणाल्या, आय अॅम सॉरी!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिला आहे. नवीन मुख्यमंत्री  निवडीसाठी काँग्रेस (Congress) हाय कमांडने तातडीने आज सायंकाळी आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री निवडीचे अधिकार पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे (Sonia Gandhi) देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सोनिया गांधी यांनी माझ्याकडे दिलगिरी व्यक्त केल्याचे अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे. 

अमरिंदरसिंग यांनी आज राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. यानंतर बोलताना अमरिंदरसिंग यांनी सोनिया गांधी यांच्याशी आज सकाळी झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला. सोनिया गांधी मला सॉरी म्हणाल्या असे सांगून अमरिंदरसिंग म्हणाले की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी आज सकाळी चर्चा केल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आमदारांची बैठक बोलावून माझा अपमान करण्याची ही तिसरी वेळ आहे. ते त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला आता मुख्यमंत्री नेमू शकतात. काँग्रेस अध्यक्षा जो निर्णय घेतील तो चांगला असेल. मी सध्या तरी काँग्रेससोबत आहे. मी समर्थकांशी चर्चा करुन भविष्यातील निर्णय घेईन. 

पक्षाच्या आमदारांची बैठक आज झाली. केंद्रीय निरीक्षक म्हणून हरीश चौधरी आणि अजय माकन हे राज्यात दाखल झाले आहेत. पक्षाच्या अनेक आमदारांनी अमरिंदरसिंगांनी बदलण्याची मागणी लावून धरली होती. त्यांचे वारंवार पक्ष नेतृत्वाशीही खटके उडू लागले होते. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने पक्ष नेतृत्वाला लवकरात लवकर या वादावर तोडगा काढायचा आहे. आजच्या बैठकीत नवीन मुख्यमंत्री निवडण्याबाबत चर्चा झाली. नवीन मुख्यमंत्री निवडण्याचे अधिकार सोनिया गांधी यांच्याकडे देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT