Amit Shah sarkarnama
देश

मोठी बातमी : 2029 साठी भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर : खुद्द अमित शाहंनीच केली घोषणा

BJP’s strategy for the 2029 Lok Sabha elections News : या बैठकीप्रसंगी 2027 मध्ये होत असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करणे आणि रणनीती आखण्यावर भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

सरकारनामा ब्युरो

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली आहे. २०२९ मध्ये होणारी निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. गुरुवारी लखनऊ येथे झालेल्या उत्तर प्रदेश भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यसमितीच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी नरेंद्र मोदी हे 2029 मध्ये चौथ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला.

या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शाह म्हणाले की, नरेंद्र मोदी सलग 3 वेळा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर ते 2029 मध्ये चौथ्यांदाही पंतप्रधान होतील. या विधानातून भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोदी यांच्या नेतृत्वावरच भर दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

उत्तर प्रदेश भाजपच्या बैठकीला 2,850 पदाधिकारी उपस्थित

उत्तर प्रदेश भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यसमितीची पहिली बैठक लखनऊमध्ये पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. याशिवाय सुमारे 2,850 पदाधिकाऱ्यांनीही या बैठकीत सहभाग घेतला.

यावेळी अमित शाह यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला. कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांना सोबत घेऊन काम करावे आणि जमिनीशी जोडलेले राहावे, असा संदेश त्यांनी दिला. 2027 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि आगामी रणनीती यावरही बैठकीत चर्चा झाली.

उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यास समान नागरी कायदा

दरम्यान, अमित शाह यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. उत्तर प्रदेशात भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास राज्यात समान नागरी कायदा (UCC) लागू केला जाईल, असे आश्वासन त्यांनी प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत दिले.

त्यामुळे भाजपने एकीकडे 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे 2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समान नागरी कायद्याचा मुद्दा पुढे आणला आहे. आगामी काळात या दोन्ही मुद्द्यांवर भाजपची रणनीती कशी आकाराला येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT