YSR Congress | jagan mohan reddy Sarkarnama
देश

आंध्राच्या राजकारणात मोठे वादळ; YSR रेड्डींच्या जयंतीदिवशीच आईने सोडली मुलाची साथ

YSR Congress | jagan mohan reddy : जगनमोहन रेड्डी यांच्या आईनेच सोडली साथ

सरकारनामा ब्युरो

हैदराबाद : आंध्रप्रदेशमधील राजकारण पुन्हा एकदा नाट्यमय वळणावर पोहचले आहे. दिवगंत माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी (Y. S. Rajasekhara Reddy) यांच्या पत्नी आणि मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी (Jagan mohan reddy) यांच्या आई विजयम्मा यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आंध्र-प्रदेशमधील जनतेमध्ये त्या विजयाम्मा म्हणून प्रसिद्ध आहेत. वायएसआर काँग्रेसच्या (YSR Congress) वार्षिक संमेलनामध्ये त्यांनी पक्षाच्या मानद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आज त्यांनी स्वतःच आपण हे पद सोडत असल्याची घोषणा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विजयम्मा यांनी घोषणा केली तेव्हा व्यासपीठावर वाय.एस.जगनमोहन रेड्डी हे देखील उपस्थित होते. दरम्यान विजयम्मा यांनी कन्या वाय.एस. शर्मिला रेड्डी यांच्यासोबत उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. शर्मिला रेड्डी या सध्या तेलंगणच्या राजकारणामध्ये सक्रिय असून तिथे त्यांनी वायएसआर तेलंगण पक्षाची स्थापना केली आहे. मध्यंतरी जगनमोहन आणि शर्मिला या भावा-बहिणींमध्ये मतभेद निर्माण झाल्याने शर्मिला रेड्डी यांनी वेगळी राजकीय वाट निवडली होती.

यावेळी बोलताना विजयाम्मा म्हणाल्या, तेलंगणमधील जनतेसाठी वायएसआर रेड्डी यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी शर्मिला एकाकी झुंज देते आहे. मी तिच्या बाजूने उभी राहिल्याने विनाकारण चर्चेला उधाण आले आहे, त्यामुळेच मी आता वायएसआर काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जगन पुन्हा मुख्यमंत्री होईल याचा मला पूर्ण विश्वास असून संकटाच्या काळामध्ये मी माझ्या मुलासोबत ठामपणे उभे होते. आता त्याचे चांगले दिवस आले आहेत, अशा स्थितीमध्ये मी माझ्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले नाही तर माझ्याच मनात अपराधीपणाची भावना दाटून येईल.

शिवाय पाणीवाटपावरून दोन्ही राज्यांमध्ये असलेला वाद मला चांगलाच ठावूक आहे. येथे दोन्ही पक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे. प्रत्येकजण आपआपल्या राज्यातील जनतेचा विचार करतो आहे. अशा स्थितीमध्ये दोन्ही पक्षांसोबत मी उभे राहणे योग्य ठरणार नाही, त्यामुळे माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकत मी पक्षाचे मानद अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एक आई म्हणून मी ठामपणे माझ्या मुलाच्या पाठीशी उभी राहीन तसेच आंध्रप्रदेशातील जनतेला देखील आधार देईल, असेही विजयाम्मा यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT