विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश): गृहपाठ (Homework) पूर्ण न केल्याच्या कारणावरून एका खासगी शाळेतील शिक्षिकेने ६ वर्षांच्या चिमुकल्याला कानाखाली मारल्यामुळे त्या बालकाचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी घटना गुरुवारी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
एलकेजी (LKG) वर्गात शिकणाऱ्या ६ वर्षांच्या विद्यार्थ्याने गृहपाठ केला नव्हता. त्यामुळे शिक्षिकेने त्याला मारहाण केली. या प्रकारामुळे चिमुकला प्रचंड घाबरला, रडू लागला आणि त्याला अचानक खोकला येऊन तो जागीच कोसळला, असा आरोप पालकांनी केला आहे.
शाळेतील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये शिक्षिका मुलाला रागावताना स्पष्ट दिसत आहे. शिक्षिकेच्या ओरडण्याने घाबरलेला मुलगा रडत हात जोडून विनवणी करत असल्याचे फुटेजमध्ये दिसते. त्यानंतर शिक्षिकेने त्याचे कपडे नीट केले आणि त्याच्या कानाखाली मारली. या मारहाणीनंतर काहीच सेकंदात मुलगा थेट शिक्षिकेच्या मांडीवर कोसळला. शिक्षिकेने त्याला बसल्या जागीच उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाकडून कोणतीही हालचाल झाली नाही.ही घटना घडताच शाळेत एकच गोंधळ उडाला.
मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेने त्यांना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. त्यांच्या मेहुण्याकडे काम करणाऱ्या स्थानिक आचाऱ्यांकडून त्यांना या घटनेची माहिती मिळाली. मुलाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शाळेत जाण्यापूर्वी मुलगा पूर्णपणे स्वस्थ होता, असा दावा पालकांनी केला आहे. शिक्षिका आणि शाळा व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
पोलीस गुन्हा दाखल: पोलिसांनी या प्रकरणी संशयास्पद मृत्यूचा (BNSS चे कलम १९४) गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि उपस्थितांचे जबाब नोंदवले जात आहेत.
शवविच्छेदन अहवाल प्रलंबित:मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन (Post-mortem) अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
मंत्र्यांचे आश्वासन: आंध्र प्रदेशचे मानव संसाधन विकास मंत्री नारा लोकेश यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "आम्ही दोषी शिक्षिका आणि शाळा व्यवस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करत आहोत. सरकार या कठीण काळात पूर्णपणे कुटुंबाच्या पाठीशी उभे आहे," असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.