Nitish Kumar & Amit Shaha
Nitish Kumar & Amit Shaha Sarkarnama
देश

नितीश कुमारांना पुन्हा झटका : राज्य जेडीयू कार्यकारिणी भाजपमध्ये दाखल

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा जनता दल युनायटेडला (जेडीयू) मोठा धक्का दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाची दमण आणि दीव राज्याची पूर्ण कार्यकारणीच भाजप मध्ये विलीन झाली आहे. भाजपकडून ट्विट करून सांगण्यात आले की, 'दमण आणि दीव जिल्हा पंचायत सदस्यांपैकी 17 जेडीयू सदस्य आणि संपूर्ण राज्य जेडीयू कार्यकारणीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बिहारमध्ये विकासाला गती देणाऱ्या भाजपला सोडून बाहुबली, भ्रष्ट आणि घराणेशाहीच्या पक्षाला नितीशकुमार यांनी पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच अरुणाचल प्रदेशातील जेडीयूचे बहुतांश आमदार भाजपमध्ये सामील झाले होते. याशिवाय मणिपूरच्या 6 पैकी 5 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात जेडीयूच्या पाच आमदारांना मणिपूरमध्ये सत्ताधारी पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले. मणिपूर विधानसभेच्या सचिवालयाने याबाबत निवेदन जाहीर केले आहे. त्यानुसार जयकिशन सिंग, नागुरसांगालुर सनाते, मोहम्मद अछाब उद्दीन, थंजाम अरुणकुमार आणि एलएम खोटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभेच्या सचिवालयाने तेव्हा म्हटले होते की, "मणिपूर विधानसभेच्या अध्यक्षांनी संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार भाजपमध्ये जेडीयूच्या पाच आमदारांचे विलीनीकरणाला मान्यता दिली आहे."

नितीश कुमार यांनी बिहारमध्ये एनडीएसोबतची युती तोडून महाआघाडी सरकार स्थापन केले. त्यांनी बिहारमध्ये राजद आणि काँग्रेससोबत युती केली आहे. तेव्हापासून, त्यांच्या पक्षाचे नेते त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून सतत प्रोजेक्ट करत आहेत.

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार हे विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याच्या शक्यताची भाजपने खिल्ली उडवली आहे. भाजपचे अमित मालवीय यांनी नुकतेच त्यांना 'लंगडा मुख्यमंत्री' म्हटले होते. नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष बिहारमध्ये तसेच इतर राज्यांमध्ये कमकुवत होताना दिसत आहेत, तरीही त्यांना पंतप्रधान होण्याचे स्वप्न आहे, अशी टीका भाजपकडून सतत करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT