Marriage fraud case Sarkarnama
देश

Marriage fraud case : भाजप आमदाराच्या लेकीच्या सासऱ्याविरोधात चार महिला आल्या समोर; लग्न करून कोट्यवधींची फसवणूक

Anuj Trivedi, BJP MLA Gyan Tiwari : सोशल मीडियात अनुज त्रिवेदी व त्याच्या लेकाच्या काळ्या कारनाम्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर ज्ञान तिवारी यांनी काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील रेऊसा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Rajanand More

Anuj Trivedi allegations : भाजपचे उत्तर प्रदेशातील आमदार ज्ञान तिवारी आणि त्यांच्या डॉक्टर लेकीची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. आमदारांच्या व्याह्याने तब्बल २५ लग्न करून महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आता आणखी चार महिला समोर आल्या आहेत.

ज्ञान तिवारी यांचे व्याही अनुज त्रिवेदी आणि जावई प्रखर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अनुज त्रिवेदी याने आपला मुंबई मोठा व्यवसाय असल्याचे सांगत बनावट ओळखीच्या आधारे तिवारी यांच्या कुटुंबांशी सोयरीक जुळविली होती. तिवारी यांनी आपल्या लेकीचे प्रखर याच्यासोबत २०२४ मध्ये शाही थाटात लग्न लावून दिले होते.

सोशल मीडियात अनुज त्रिवेदी व त्याच्या लेकाच्या काळ्या कारनाम्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर तिवारी यांनी काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील रेऊसा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता अनुजविरोधात आणखी चार महिला समोर आल्या आहेत. या पीडित महिलांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले आहे. ओळख लपवून लग्न करणे, शारीरिक संबंध ठेवणे आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे.

संबंधित चार महिलांनी सीतापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आयुष चौधरी यांच्याकडे याबाबतची तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार, अनुजने अजय अग्रवाल, संतोष सिंह आणि अजय गुप्ता अशा खोट्या नावांचा वापर करून फसवणूक केली. या तक्रारीमध्ये प्रखरवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्रिवेदी बाप-लेकाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

अनुज त्रिवेदीचे कुटुंब मुळचे सीतापूरमधील मिश्रिख येथील आहे. त्याच्यावर महाराष्ट्रातही गुन्हा दाखल असून एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्याचे वृत्त आज तकने दिले आहे. दरम्यान, आमदार ज्ञान तिवारी यांनी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या लेकीसह फेसबूक लाईव्ह करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. लग्नानंतर अडीच वर्षांनी अनुजचे काळे कारनामे समजल्यानंतर लेकीला माहेरी आणल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT