Aryan Khan
Aryan Khan  
देश

आर्यन खानच्या व्हॉट्स अॅपमध्ये आंतरराष्ट्रीय लिंक; न्यायालयानं दिला झटका

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अंमली पदार्थविरोधी विभागाने (NCB) रविवारी रात्री एका लक्झरी क्रुझवर छापा टाकत १० जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) इतर ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यनसह इतर आरोपींना विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना सात ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीकडून न्यायालयात काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना पुढील तीन दिवस एनसीबीच्या कोठडीत घालवावे लागणार आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईत 20 ग्रॅम कोकेन, 30 ग्रॅम चरस, 10 ग्रॅम एमडी आणि 20 ग्रॅम टॅबलेट्स जप्त केल्या आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयामध्ये एनसीबीने 11 तारखेपर्यंत कोठडी मागितली होती.

तिघांच्या जामीनावर झालेल्या सुनावणीवेळी एनसीबीच्या वतीने त्याला जोरदार विरोध कऱण्यात आला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नयायालयाने या प्रकरणात आणखी तपास होण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी आरोपी एनसीबीकडे असणं गरजेचे असल्याचेही सांगत अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी आर. एम. नेरलीकर यांनी तिघांना सात तारखेपर्यंत कोठडी सुनावली.

दरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी जामिनाला विरोध करताना आर्यनच्या व्हॉट्स अॅप चॅटची माहिती दिली. आर्यनच्या फोनमधील व्हॉट्स अॅप चॅटमध्ये काही लिंक आढळून आल्या आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे दिसत आहे. केवळ कमी प्रमाणात डॅग्ज आढळले म्हणून जामीन देणे चुकीचे आहे, असं सिंग म्हणाले. त्यांनी यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन निकालांचीही माहिती देत हा गुन्हा अजामीनपात्र असल्याचे सांगितले.

सिंग म्हणाले, 'आम्हाला डॅग्जचे पुरवठादार, त्यासाठी कुठून पैसा येतो याचाही शोध घ्यायचा आहे. आरोपींना आणखी काही दिवस कोठडी मिळाल्यास आम्ही त्याच्या मुळापर्यंत पोहचू.' आर्यन खानची बाजू मांडताना अॅड. सतिश मानेशिंदे यांनी त्याचा पार्टीशी काही संबंध नसल्याचे न्यायालयाला सांगितले. आर्यन त्याच्या मित्रासोबत तिथे गेला होता. पार्टीसाठी त्याने कसलेही पैसे दिलेले नाहीत. माझ्या बॅगेत काही आढळले नाही. काही वेळाने त्यांनी फोन ताब्यात घेत चौकशी सुरू केली. मर्चंट हा त्याचा मित्र आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, रविवारी रात्री मुंबईहून गोव्याला निघालेल्या लक्झरी क्रुझवर ड्रग्झ पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. माहितीच्या आधारे एनसीबीने सापळा रचला होता. पार्टीत ड्रग्ज घेतलं जात असल्याचं लक्षात येताच एनसीबीच्या पथकाने पार्टी थांबवली आणि क्रूझ पून्हा मुंबई पोर्टवर घेण्यात आलं. कारवाई दरम्यान सर्व एनसीबी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे फोन बंद होते. या प्रकरणी क्रुझवर काम करणारे १० कर्मचारी आणि ६ पार्टी आयोजकांना समन्स बजावून बोलावलं आहे. या क्रूजवरील पार्टी एका परदेशी कंपनी आणि मनोरंजन वाहिनीने संयुक्तपणे आयोजित केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT