नवी दिल्ली : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) प्राध्यापिका शांतिश्री धुलिपूडी पंडित (Santishree Dhulipudi Pandit) यांची दिल्लीतील नामांकित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी सोमवारी कुलगुरूपदाचा कार्यभार हाती घेतला. मात्र, या नियुक्तीनंतर त्या वादात अडकल्या आहेत. त्यांची महात्मा गांधी, नथुराम गोडसे, जेएनयूबाबतची जुनी ट्विट व्हायरल झाली आहेत. पण नियुक्ती झाल्यानंतर पंडित यांनी आपले अकाऊंटच डिलिट केलं आहे.
शांतिश्री पंडित या पुढील पाच वर्षांसाठी कुलगुरूपदी असतील. पंडित यांच्या रुपाने जेएनयूला पहिल्या महिला कुलगुरू (Vice Chancellor) मिळाल्या आहेत. त्यामुळे पंडित यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी सोमवारी एम. जगदीश यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पॉलिटिक्स आणि पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन विभागात कार्यरत आहेत. मागील 29 वर्षांपासून त्या पुणे (Pune) विद्यापीठात आहेत.
पंडित यांचे @SantishreeD हे ट्विटर अकाऊंट होते. त्यावर त्यांनी यापूर्वी केलेली अनेक ट्विट आता सोशल मीडियात व्हायरल झाली आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी गांधीजी आणि गोडसेविषयीही वादग्रस्त विधानं केली आहेत. शेतकरी आंदोलनावरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे हिंदु, मुस्लिम, जेएनयू आदी मुद्यांवर केलेल्या ट्विटवरूनही अनेकांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे.
तृणमूल काँग्रेसचे (TMC) प्रवक्ते संकेत गोखले यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. ख्रिश्चन समाजाला राईस बॅग कन्व्हर्ट्स म्हटल्याचा संदर्भ देत गोखले यांनी शिक्षणमंत्र्याला सवाल केला आहे. विद्यापीठातील ख्रिश्चन विद्यार्थ्यांना असंच वागवलं जाणार आहे का आणि हे सरकारचे धोरण आहे का, असं गोखले म्हणाले आहेत. कम्युनिस्ट नेत्या कविता कृष्णन यांनीही निशाणा साधला आहे. दरम्यान, कुलगुरूपदी नियुक्ती होताच पंडित यांनी ट्विटर अकाऊंट डिलिट केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
शांतिश्री पंडित यांच्याविषयी...
पंडित यांनी 1988 मध्ये गोवा विद्यापीठातून अध्यापन कामाला सुरूवात केली. त्या 1993 मध्ये पुणे विद्यापीठात दाखल झाले. विद्यापीठातील विविध महत्वाच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आणि इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (ICSSR) या संस्थांच्या सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी आतापर्यंत 29 जणांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आहे.
मद्रासमधील प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी इतिहास विषयात पदवी तर सामाजिक मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्या यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून सामाजिक कार्य विषयात पदविका मिळवली आहे. पंडित या जेएनयूच्याही विद्यार्थिनी आहेत. त्यांनी आंरराष्ट्रीय संबंध या विषयात एमफील केले आहे. तर त्याच विषयात त्यांनी पीएचडीही मिळवली आहे. त्या सध्या पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.