assam rifles recruitment
assam rifles recruitment  Sarkarnama
देश

भरतीसाठी आसाममध्ये गेलेल्या महाराष्ट्राच्या तरुणांना नरक यातना; जेवणपाण्याविना हाल

सरकारनामा ब्युरो

पुणे : महाराष्ट्रातून भरतीसाठी आसाममध्ये गेलेल्या तरुणांना अक्षरशः नरक याताना सहन कराव्या लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गरम पाणी आणि चांगल्या दर्जाच्या जेवण-पाण्याविना या तरुणांचे हाल होत असून लोकप्रतिनिधींकडे मदत मागूनही काही उपयोग झालेला नसल्याचेही सांगितले जात आहे. या भीतीपोटी २० ते २५ जण पळून आले आहेत, मात्र अजूनही २०० हुन अधिक मुले आसामध्येच अडकून पडले असल्याची माहिती आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील २०० ते २५० उमेदवार ३ जानेवारीला आसाम रायफल्सच्या भरतीसाठी आसाममधील करबी अँगलाँग या जिल्ह्यातील दिपू या शहरात गेले होते. त्याठिकाणी त्यांची भरती प्रक्रिया होणार होती. भरतीपूर्वी उमेदवारांची कोरोनाची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये ६० ते ७० जण कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यासह २०० हून अधिक तरुणांना दिपू वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

दिपू हे थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे तिथे गरम पाणी वापरले जाते. मात्र रुग्णालयात दाखल केल्यापासून सुरुवातीचे २ ते ३ दिवस तरुणांना जेवण, पुरेसे पाणी देण्यात आले नाही. ३ दिवसानंतर तरुणांना निकृष्ट दर्जाचे जेवण आणि थंड पाणी देण्यात आले. या जेवण आणि थंड पाण्यामुळे अनेक तरुण आजारी पडले असून त्यांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागला आहे. त्यांची तब्येत बिघडू लागली आहे. या यातनांना वैतागून काही जणांनी भरती सोडून पळून येत स्वतःची सुटका करवून घेतली. परंतु अजूनही २०० पेक्षा जास्त तरुण तेथे अडकून पडले आहे.

याबाबत तरुणांनी स्थानिक प्रशासन, महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष, नेते, सरकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, मात्र अजूनही त्यांना मदत मिळाली नसल्याने तरुण तिथेच अडकून पडलेले आहेत. यामध्ये पुणे, नगर, सांगली, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, धुळे अशा महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील तरुणांचा समावेश आहे. भरतीसाठी गेलेले हे तरुण ४ ते ५ वर्षांपासून कठीण परिस्थितीवर मात करीत संबंधित पदासाठीची तयारी करीत आहेत. पण कोरोनामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आल्याने तरुण आणखीनच हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राचे मंत्री सतेज पाटील यांनी या तरुणांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेस आणि आसाम युवक काँग्रेसला आवाहन केले आहे. त्यांनी सकाळ माध्यम समुहाची बातमी ट्विट करत या तरुणांना मदत करण्याची विनंती केली आहे. पाटील यांनी या तरुणांचा आणि हॉस्पिटलचा स्थानिक पत्ताही या ट्विटमध्ये दिला आहे. पाटील यांच्या या ट्विटनंतर राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बीवी श्रीनिवास यांनी आसाम युवक काँग्रेसला मदत करण्यासाठी सुचना दिल्या असल्याचे सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT