Haryana Assembly Election Sarkarnama
देश

Assembly Election 2024 : भाजप 2 डझन आमदारांचे तिकीट कापणार; सर्व्हेने वाढवली चिंता

Rajanand More

Chandigarh : हरियाणातील सत्ताधारी भाजपसमोर आमदारांविषयी लोकांमध्ये असलेल्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. भाजपच्याच एका सर्व्हेमध्ये अनेक आमदारांविषयी जनतेमध्ये आक्रोश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा तब्बल दोन डझन आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

भाजपची मागील दहा वर्षांपासून हरियाणामध्ये सत्ता आहे. हॅट्ट्रिक करण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. त्यासाठी मतदारसंघनिहाय उमेदवारांची चाचपणी करण्यात आली असून त्यावर अंतिम हात फिरवला जात आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 1 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान आहे.

काही जुन्या आमदारांचे तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यासाठी काँग्रेस, आप व इतर स्थानिक पक्ष, अपक्ष आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात असल्याची चर्चा आहे. उमेदवारांना प्रचारासाठी अधिकाधिक वेळ मिळावा, यासाठी या आठवडाभरातच सर्व उमेदवार निश्चित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

राज्यात विधानसभेच्या 90 जागा आहे. या सर्व जागांसाठी भाजपने इच्छुकांची चाचपणी केली आहे. त्यानुसार एका जागेसाठी 50 ते 200 जण इच्छूक आहेत. त्यातून प्रत्येक जागेसाठी सहा इच्छुकांची पहिल्या टप्प्यात निवड केली जाईल. त्यानंतर अंतिम उमेदवाराची निवड होईल. पुढील दोन-तीन दिवसांत केंद्रीय नेतृत्वाकडे उमेदवारांची नावे पाठवली जाऊ शकतात.

लोकसभेत फटका

लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात फटका बसला आहे. मागील निवडणुकीत भाजपने दहा पैकी दहा जागांवर विजय मिळवला होता. 2024 मध्ये मात्र भाजपला करिष्मा दाखवता आला नाही. पक्षाला केवळ पाच जागा मिळाल्या. तर काँग्रेसनेही पाच जागा मिळवत भाजपला जोरदार टक्कर दिली. हीच स्थिती विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये, यासाठी भाजपकडून उमेदवार निवडीसाठी कसून प्रयत्न केले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT