Bajrang Dal Activist Harsha
Bajrang Dal Activist Harsha  Sarkarnama
देश

कर्नाटक पुन्हा पेटलं! बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) हिजाबवरून (Hijab) वाद पेटला असून, यावरून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वादामुळे पोलिसांनी शिमोग्यात काही काळ जमावबंदीही लागू करावी लागली होती. आता शिमोग्यात (Shivmogga) बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. यानंतर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या असून, मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

बजरंग दलाच्या 26 वर्षीय हर्ष या कार्यकर्त्याची काल (ता.20) रात्री शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. यानंतर शिमोग्यात तणावाचे वातावरण आहे. काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी जादा बंदोबस्त तैनात केला असून, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याचबरोबर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे.

हर्ष हा टेलर होता. त्याच्यावर चार जणांनी काल रात्री 9 वाजता हल्ला केला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्याचा जीव वाचू शकला नाही. या घटनेनंतर अज्ञात व्यक्तींनी अनेक वाहनांना आगी लागल्या. या प्रकरणाचा हिजाब वादाशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हर्ष आणि एका टोळक्याची ओळख होती. पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हल्ला झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. हर्ष याची हत्या करणाऱ्यांना लवकरच पकडले जाईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, कर्नाटकात अनेक महाविद्यालयांमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थिनी आणि भगव्या रंगाचे उपरणे घेतलेले विद्यार्थी समोरासमोर येऊन वाद होत होते. अनेक महाविद्यालयांमध्ये घोषणाबाजी आणि दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. यामुळे महाविद्यालयांच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेले आहे. बुरखा वादावर सहा विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली आहे. वर्गात बुरखा घालण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी विनंती विद्यार्थिनींनी याचिकेद्वारे केली आहे. राज्यातील हिजाब वादावर उच्च न्यायालयाने अंतरीम आदेश दिला आहे. यात हिजाब आणि भगवे उपरणे हे दोन्ही घालून शाळा व महाविद्यालयांमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT