भोपाळ : आश्रम (Ashram) या वेब सीरीजच्या (Web Series) सेटवर बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी 24 ऑक्टोबरला राडा घातला होता. त्यांनी दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) आणि सेटवरील कर्मचाऱ्यांवर हल्ला करून तोडफोड केली होती. आता यामागील मुख्य सूत्रधार हा खून प्रकरणात शिक्षा झालेला दोषी असल्याचे समोर आले आहे.
बजरंग दलाचा प्रांत प्रमुख सुरेश सुडेले (Suresh Sudele) याने कार्यकर्त्यांसह हल्ला केला होता. आश्रमच्या सेटवर हल्ला करणारे सुडेलेसह सातही जण अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जामिनावर सुटले होते. आश्रमच्या टीमने तक्रार न दिल्याने त्यांची सुटका झाली होती. या प्रकरणाचा सूत्रधार सुडेले याला एका खून प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आला होता. याबाबतचे वृत्त 'एनडीटीव्ही'ने दिले आहे.
न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या दोषीने जामिनावर बाहेर आल्यानंतर हल्ला केल्याने मध्य प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. सुडेलेवर आधीही अनेक गुन्हे दाखल आहेत. भोपाळमधील व्यावसायिक भागचंद यांच्या हत्या प्रकरणात त्याला शिक्षा झाली होती. नंतर चार वर्षांनी तो जामिनावर सुटला होता. जामिनावर असलेल्या सुडेलेने अशा प्रकारे जगजाहीरपणे आश्रमच्या हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा जामीन तातडीने रद्द करावा, असे मत कायदेतज्ञ व्यक्त करीत आहे. याबाबत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
आश्रम या वेबसीरीजच्या तिसऱ्या सीझनचे शूटींग भोपाळमध्ये सुरू होते. त्यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या सेटवर अचानक हल्लाबोल केला होता. प्रकाश झा मुर्दाबाद, बॉबी देओल मुर्दाबाद, जय श्रीराम अशा घोषणा देत कार्यकर्ते सेटवर आले होते. काहींच्या हातात काठ्याही होत्या. सेटवर जात त्यांनी झा यांच्या अंगावर शाई फेकली. काही कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत.
या वेब सीरीजच्या माध्यमातून हिंदूंचा अपमान होत असल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला. वेबसीरीजचे नाव बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे. झा यांनी हे नाव बदलण्याची तयारी दर्शवल्याचेही बजरंग दलाच्या नेत्याने सांगितले. त्यांनी आश्रम-1, आश्रम-2 सीरीज बनवल्या आणि आता आश्रम-3 चे शूटिंग सुरू आहे. प्रकाश झा यांनी यामध्ये गुरू महिलांचा छळ करत असल्याचे दाखविले आहे.
चर्च किंवा मदरशावर असा चित्रपट बनविण्याची हिंमत त्यांच्यात आहे का, असे आव्हानही सुरेश सुडेले याने त्यावेळी दिले होते. तो म्हणाला होता की, आम्ही झा यांना ही सीरीज बनवू देणार आहे. आम्ही फक्त प्रकाश झा यांचा चेहरा काळा केला आहे. आता आम्ही बॉबी देओलला शोधत आहोत. त्याने त्याच्या भावाकडून (सनी देओल) काही शिकायला हवे. त्याच्या भावाने देशभक्तीपर चित्रपट तयार केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.