Karnataka High Court Sarkarnama
देश

Karnataka High Court : आजच्या जमान्यात कोणी कृष्ण वाचवायला येणार नाही! महिलेची निर्वस्त्र धिंड काढल्याने न्यायालयाचा संताप

Belgaon Woman Assault Case : बेळगाव जिल्ह्यात एका महिलेला निर्वस्त्र करून बेदम मारहाण

Anand Surwase

Karnataka News : कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात एका महिलेला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेवरून कर्नाटक उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाभारतात देखील अशा प्रकारची लाजीरवाणी घटना घडली नाही. द्रौपदीच्या मदतीला कृष्ण धावून आला होता. तर आजच्या जमान्यात दुर्योधन महिलांची अब्रू लुटत असल्याचे विधान न्यायालयाने केले आहे.

खांबाला बांधून मारहाण

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, बेळगाव जिल्ह्यात 11 डिसेंबर रोजी एका महिलेला गावातीलच एका कुटुंबातील सदस्यांनी घरातून बाहेर ओढत आणले आणि तिला निर्वस्त्र केले. त्यानंतर तिला मारहाण करत गावातून धिंड काढण्यात आली. क्रुरतेचा कळस म्हणजे त्यांनी पीडितेला एका खांबाला बांधून बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. (Belgaon Woman Assault Case Karnataka High Court Slams State Govt)

मुलीला पळवून नेल्याचा राग

दरम्यान, पीडित महिलेच्या मुलाने 4 डिसेंबर रोजी गावातीलच एका मुलीला पळवून नेले होते. त्या मुलीचा 5 डिसेंबर रोजी विवाह होणार होता. त्यापूर्वीच ती मुलासोबत पळून गेल्याने संतप्त झालेल्या कुटुंबाने त्या मुलाच्या आईचा अशा प्रकारे लाजीरवाणा छळ केला. यावर स्वत: न्यायालयाने याचिका दाखल करून घेत तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती प्रसन्न वरळे आणि न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांनी याचिका दाखल करून घेतली आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी बेळगाव पोलिस अधीक्षकांना स्वत: हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जनावरे देखील असा अत्याचार करत नाहीत

या घटनेवर संताप व्यक्त करताना न्यायालयाने म्हटले आहे की, ही काही किरकोळ घटना नाही, अशा संतापजनक घटनेची दखल आम्ही स्वत: घेत असून या प्रकरणाचा छडाही तत्काळ लावला जाईल. महिलेवर ज्याप्रमाणे अत्याचार करण्यात आला आहे, अशी घटना महाभारतात देखील घडली नसेल. आजच्या काळात फक्त महिलांच्या इज्जतीवर हात टाकणारे दिसून येत आहेत. ज्याप्रमाणे द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना कृष्ण आला होता, तसा कोणी कृष्ण येणार नाही अशा शब्दात समाजातील बघ्याची भूमिका घेणाऱ्यांची कठोर शब्दांत निंदा केली आहे.

तसेच या अत्याचाराच्या घटनेवर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, जनावरे देखील असा अत्याचार करत नाहीत, एका महिलेला निर्वस्त्र करून खांबाला बांधून मारत असताना तिची काय अवस्था झाली असेल याची कल्पना देखील करवत नसल्याची प्रतिक्रिया न्यायमूर्ती वरळे यांनी दिली आहे.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT