COVAXIN
COVAXIN  
देश

अखेर कोव्हॅक्सिनवर जागतिक आरोग्य संघटनेची मोहोर

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : मागील अनेक महिन्यांपासून जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मान्यतेच्या प्रतिक्षेत असलेल्या भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin) या कोरोना लशीबाबत आनंदाची बातमी आहे. अखेर संघटनेने बुधवारी लशीच्या परिणामकारकता व सुरक्षिततेवर शिक्कामोर्तब करत मान्यता दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या या निर्णयामुळे कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांना परदेशात जाण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. तसेच कोव्हॅक्सिन लशीचा इतर अनेक देशांमध्ये वापराचा मार्गही मोकळा झाला आहे. संघटनेने 18 वर्षांपुढील नागरिकांना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस असल्याने भारतासाठी ही महत्वाची घडामोड मानली जात आहे.

कोव्हॅक्सिनचा समावेश इमर्जन्सी यूज लिस्टिंगमध्ये (ईयूएल) करावा, यासाठी भारत बायोटेकने काही महिन्यांपूर्वी डब्लूएचओकडे अर्ज केला आहे. जुलै अथवा सप्टेंबर महिन्यात लशीला मान्यता मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. जगभरातील 60 देशांमध्ये कोव्हॅक्सिनला मान्यता मिळणे प्रलंबित आहे. यात अमेरिका, ब्राझील, हंगेरी आदी देशांचा समावेश आहे. आतापर्यंत 13 देशांमध्ये या लशीला मान्यता मिळाली आहे. आणखी देश मान्यता देण्याच्या मार्गावर आहेत.

आता डब्लूएचओने मान्यता दिल्याने इतर देशांमध्येही कोव्हॅक्सिनचा मार्ग मोकळा होणार आहे. डब्लूएचओने कोव्हॅक्सिनला आतापर्यंत मान्यता न दिल्याने अमेरिका, कॅनडा, आयर्लंड आणि युरोपीय समुदायानेही कोव्हॅक्सिनला मान्यता दिलेली नाही. जगातील आघाडीची विद्यापीठेही त्यांच्या देशांनी अथवा डब्लूएचओने मान्यता दिलेली लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच परवानगी देत आहेत. कोव्हॅक्सिन घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात गेल्यानंतर सक्तीच्या हॉटेल विलगीकरणात राहावे लागते. हॉटेलमध्ये 14 दिवस राहणे हे विद्यार्थ्यांसाठी खर्चिक आहे, अशी तक्रार विद्यार्थ्यांकडून केली जात होती.

डब्लूएचओने फायजर, मॉडर्ना आणि कोव्हिशिल्ड या कोरोना लशींना मान्यता दिली आङे. परंतु, या लशींच्या यादीत कोव्हॅक्सिन नव्हते. या लशीच्या परिणामकारकतेबाबत आणखी माहिती सादर करावी लागेल, असे डब्लूएचओने म्हणणे होते. त्यानंतर भारत बायोटेकने डब्लूएओची मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व माहिती सादर केली होती. त्यानंतर बुधवारी त्याला मान्यता मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT