Chhattisgarh Election Sarkarnama
देश

Chhattisgarh Election : बघेल विरुद्ध बघेल; छत्तीसगडमध्ये 'काका-पुतण्या' एकमेकांना भिडणार!

Chetan Zadpe

Chhattisgarh Election : काँग्रेसने छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 30 उमेदवारांच्या यादीत मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि टी. एस. सिंह देव यांचीही नावे आहेत. भूपेश बघेल सध्याचा त्यांचा मतदारसंघ पाटणमधूनच निवडणूक लढवणार आहेत, पण आता त्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात तगडे आव्हान मिळणार आहे.

पाटणमधून मुख्यमंत्री बघेल यांचे नाव पुढे आल्यानंतर आता राजकीय लढाईत काका-पुतणे आमने-सामने येणार हे निश्चित झाले आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये भाजपने पहिल्या यादीत पाटणमधून भूपेश बघेल यांचे पुतणे विजय बघेल यांना तिकीट दिले होते. काँग्रेसची यादी जाहीर केल्यानंतर छत्तीसगडमध्ये 'काका विरुद्ध पुतण्या' संघर्ष होणार हे स्पष्ट झाले आहे. (Bhupesh Baghel Vs Vijay Baghel)

भाजपने ऑगस्टमध्ये पहिल्या यादीत दुर्गचे लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार विजय बघेल यांना पाटणमधून तिकीट आधीच जाहीर केले आहे. विजय बघेल हे छत्तीसगडच्या राजकारणातील एक तगडे नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय पाटणच्या जागेवर ओबीसी मतदारांची संख्या हाही एक मोठा घटक आहे. मुख्यमंत्री भूपेश आणि विजय हे दोघेही एकाच सामाजिक-जातीय पार्श्वभूमीतून येत असल्याने, या जागेवरची निवडणूक अत्यंत रंजक आणि चुरशीची होणार आहे.

काका-पुतण्यामध्ये संघर्ष सुरू -

पाटण मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर काका-पुतण्याच्या संघर्षात दोघांनीही एकएकदा एकमेकांचा पराभव घडवून आणला आहे. 2008 मध्ये विजय बघेल यांनी निवडणुकीत आपले काका भूपेश बघेल यांचा पराभव केला होता आणि भूपेश बघेल यांनी 2013 च्या विधानसभा निवडणुकीत मैदान मारत पराभवाचा बदला घेतला होता.

मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत 2018 मध्ये भाजपने या जागेवरून विजय बघेल यांना तिकीट न देता मोतीलाल साहू यांना उमेदवारी दिली होती. त्याचा परिणाम म्हणजे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मोतीलाल साहू यांचा दणदणीत पराभव केल्याचेही दिसून आले. एकूणच या जागेवर भूपेश बघेल दोनदा विजयी झाले आहेत.

विजय बघेल हे दुर्गचे खासदार -

विधानसभा निवडणूक 2018 मध्ये भाजपने विजय बघेल यांना उमेदवारी दिली नव्हती. भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय बघेल यांना उमेदवारी दिली. विजय बघेल हे दुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांचा दिल्लीच्या राजकारणात प्रवेश झाला.

आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, विजय बघेल यांना एकदा छत्तीसगड काँग्रेसचे नंबर एकचे नेते मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात रिंगणात उतरवले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील खासदार आणि मंत्र्यांना राज्यात तिकीट देण्याची योजना असून, 2024 च्या सेमी फायनलसाठी भाजपची रणनीती आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना तगडे आव्हान देऊ शकेल, असा उमेदवार उभा करणे हे भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान होते आणि अशा परिस्थितीत विजय बघेल हेच राज्यातील एकमेव नेते आहेत.

मुख्यमंत्री बघेल यांच्यासाठीही चुरशीची लढत -

राजकीय जाणकारांच्या मते, या वेळी राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासाठी पाटणची जागा अतिशय आव्हानात्मक असणार आहे. सत्ताविरोधी लाटेचा परिणामही दिसून येऊ शकतो. 2018 मध्ये भाजपने विजय बघेल यांना संधी न दिल्याने भूपेश बघेल यांना विजयासाठी फारशी मेहनत करावी लागली नाही. मात्र, या वेळी निवडणुकीत लढत काका-पुतण्यामध्ये असून दोघांचा वरचष्मा आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT