Rashmi Verma
Rashmi Verma Sarkarnama
देश

भाजपला मोठा धक्का; महिला आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

सरकारनामा ब्युरो

पाटणा : बिहारमधील (Bihar) पश्चिम चंपारणमधील नरकटियागंज मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार रश्मी वर्मा (Rashmi Verma) यांनी रविवारी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्यामुळे भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. राजीनाम्याचे कारण अद्याप समोर आलं नसलं तर त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.

रश्मी वर्मा यांनी रविवारी विधानसभा अध्यक्षांना तीन ओळींचे पत्र लिहित राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. वैयक्तिक कारणास्तव आपल्या मर्जीने राजीनामा देत असून त्याचा स्वीकार करावा, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. पत्रात त्यांनी कोणतंही ठोस कारण दिलेलं नाही.

वर्मा यांचा राजीनामा हातात घेतलेला फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या पत्रावर 9 जानेवारी 2022 हीच तारीख आहे. त्यामुळे हे पत्र आजचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजीनाम्यामागे कोणतेही राजकीय कारणही सांगितले जात नाही. काही कौटूंबिक वादातून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चाही आहे. संपत्तीच्या वादातून त्यांच्यासह समर्थकांविरोधात दावेही दाखल करण्यात आल्याचे समजते.

बिहारमध्ये भाजप व संयुक्त जनता दल (JDU) सतेत आहे. वर्मा या 2014 मध्ये जदयूतून भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्या तिकीटावर पोटनिवडणूकही जिंकली. 2015 मध्ये भाजपने तिकीट न दिल्याने त्या अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या होत्या. त्यामुळे नरकटियागंज विधानसभेची निवडणूक (Assembly Election) तिरंगी झाली होती. या निवडणुकीत वर्मा यांचे दीर विनय वर्मा काँग्रेसचे (Congress) उमेदवार होते.

विनय वर्मा सुमारे 57 हजार मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर 2020 च्या निवडणुकीत भाजपने रश्मी यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. आता त्यांनी राजीनामा दिल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने भाजपला धक्का बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT