थोडक्यात महत्वाचे :
राहुल गांधींच्या ‘मतदार अधिकार यात्रे’नंतरच्या सर्व्हेमध्ये बिहारमध्ये सत्ताविरोधी लाट असल्याचे स्पष्ट झाले असून तब्बल 48% मतदार सरकारविरोधात आहेत.
तटस्थ मतदारांचा 22% मोठा आकडा निवडणुकीचे संपूर्ण गणित बदलू शकतो; त्यांनी अजून कोणत्याही पक्षाच्या बाजूने निर्णय घेतलेला नाही.
नितीश कुमार यांचा जुना करिष्मा ओसरलेला दिसत असून काँग्रेस-राजदच्या यात्रेचा काहीसा प्रभाव दिसला तरी मतदार एका ठराविक पक्षाकडे झुकलेले नाहीत.
Bihar election updates : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीकडून जोरदार तयारी सुरू असताना एका सर्व्हेने सर्वांचेच टेन्शन वाढवले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेनंतर करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये तटस्थ मतदार मातब्बर नेत्यांना हिसका दाखवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच बिहारमध्ये सध्यातरी सत्ताविरोधी लाट असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
वोट वाइब या एजन्सीने हा सर्व्हे केला आहे. त्यामध्ये तब्बल 48 टक्के मतदारांनी सरकारविरोधात आपली भूमिका मांडली आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही मतदारांना बदल हवा असल्याचे या सर्व्हेत आढळून आले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पूर्वीचा करिष्मा आता राहिला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या एकत्रित यात्रेचा परिणामही दिसत आहे.
असे असले तरी मतदारांनी कोणत्याही एका पक्षाच्या पारड्यात आपले मत टाकलेले नाही. कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता मिळताना दिसत नाही. मतदार पर्यायाच्या शोधात असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये तटस्थ मतदारांचा आकडा मोठा असून हेच मतदार बिहारमध्ये करिष्मा घडवून आणू शकतात, अशी शक्यता या सर्व्हेमध्ये समोर आली आहे.
सर्व्हेमध्ये विविध भागातील 5635 मतदारांचे मत जाणून घेण्यात आले आहे. यामध्ये जातीय समीकरण तसेच प्रादेशिक घटकांचा विचार करण्यात आला आहे. एकीकडे 48 टक्के लोकांचा सत्ताधाऱ्यांविरोध असला तरी अजून 27.1 टक्के लोकांचा नितीश कुमार सरकारवर विश्वास असल्याचे दिसते. या सर्व्हेमध्ये तटस्थ मतदारांचा आकडा तब्बल 22 टक्के आहे.
अद्याप मतदान कुणाला करायचे किंवा सत्ताधारी आणि विरोधकांपैकी सध्यातरी कुणीच योग्य नसल्याबाबतचे मत असलेल्या मतदारांचा 22 टक्के हा आकडा खूप मोठा मानला जात आहे. मतदानातून हे मतदार निवडणुकीचे संपूर्ण चित्रच बदलू शकतात. त्यामुळे या मतदारांवर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार असल्याचे या सर्व्हेतून दिसते. सत्ताधारी आणि विरोधकांची डोकेदुखी वाढविणारी ही आकडेवारी आहे.
राहुल गांधी यांच्या यात्रेनंतर हा सर्व्हे करण्यात आला आहे. मात्र, थेट काँग्रेस किंवा राजदला त्याचा फायदा होईल, असे संकेत सर्व्हेतून मिळताना दिसत नाहीत. मात्र, सरकारविरोधी मत तयार करण्यात काही प्रमाणात त्याचा परिणाम झाला असल्याचे मान्य करावे लागेल. सरकारविरोधात तटस्थ लोकांचे मन वळविण्याचे मोठे आव्हान विरोधकांसमोर असणार आहे. तर नितीश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा लोकांवर बिंबविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना आणखी जोरकसपणे प्रयत्न करावे लागणार असल्याचे सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.
Q1: बिहारच्या सर्व्हेत कोणते मुख्य निष्कर्ष दिसून आले?
A: 48% मतदार सरकारविरोधात असून तटस्थ मतदारांचा आकडा 22% आहे.
Q2: नितीश कुमार यांच्याबाबत मतदारांचे मत काय आहे?
A: त्यांच्या करिष्म्याची चमक ओसरल्याचे सर्व्हेमध्ये स्पष्ट झाले आहे.
Q3: राहुल गांधींच्या यात्रेचा काही परिणाम झाला का?
A: थेट फायदा काँग्रेस-राजदला दिसत नाही, पण सरकारविरोधी मत तयार करण्यात परिणाम झाला आहे.
Q4: आगामी निवडणुकीचे गणित कोणावर अवलंबून आहे?
A: तटस्थ मतदारच निवडणुकीचे अंतिम चित्र बदलू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.