Bihar Inspirational Story: मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्यभर कष्ट उपसले, समाजाचे टोमणे सहन केले आणि आर्थिक अडचणींवर मात करत त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. एका वडिलांच्या या जिद्दीला सातही मुलींनी आपल्या कर्तृत्वातून सलाम केला आहे.
बिहारमधील सारण जिल्ह्यातील एकमा येथील 'सिंह सिस्टर्स'ची ही कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, या सातही बहिणी आज वेगवेगळ्या सरकारी विभागांत कार्यरत असून देशसेवेची जबाबदारी पार पाडत आहेत.
एकमा मधील स्टेट बँक रोडवर असलेल्या एका घराबाहेर 'Singh Sisters Palace' अशी पाटी लावण्यात आली आहे. त्यावर सात बहिणींची नावे आणि त्या कार्यरत असलेल्या विभागांची माहिती आहे. ही पाटी केवळ एका घराची ओळख नसून एका वडिलांच्या संघर्षाची आणि सात मुलींच्या यशाची साक्ष देणारी आहे.
कमल सिंह ऊर्फ राजकुमार सिंह यांच्या घरी एकापाठोपाठ सात मुलींचा जन्म झाला. त्यावेळी नातेवाईक आणि समाजातील काही लोकांनी त्यांना टोमणे मारले. मुलींचे शिक्षण, लग्न आणि भविष्यातील जबाबदाऱ्यांची चिंता व्यक्त केली. मात्र, कमल सिंह यांनी या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मुलींना शिकवण्याचा आणि सक्षम बनवण्याचा निर्धार केला.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी एकमा बाजारात गिरणी (आटाचक्की) सुरू केली. दिवसभर मेहनत करून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा आणि भवितव्याचा खर्च भागवला. मुलींना केवळ शिक्षण देऊन थांबायचे नाही, तर त्यांना सरकारी सेवेत पाठवायचे, हे त्यांचे स्वप्न होते.
मुलींच्या यशामागे वडिलांनी घेतलेली मेहनत आणि शिस्तीचा मोठा वाटा आहे. कमल सिंह रात्री उशिरापर्यंत मुलींना अभ्यासासाठी प्रोत्साहन देत असत. त्यानंतर पहाटे चार वाजताच त्यांना उठवून मैदानावर धावण्याचा सराव करायला घेऊन जात. अभ्यासासोबत शारीरिक तयारीवरही त्यांनी भर दिला. मुलींनीदेखील वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत मेहनत सुरू ठेवली.
२००६ मध्ये रेणू सिंह यांची सशस्त्र सीमा बलामध्ये (SSB) कॉन्स्टेबल पदावर निवड झाली. त्यांच्या यशाने इतर बहिणींनाही प्रेरणा मिळाली. त्यानंतर एकेक करत सातही बहिणींनी सरकारी नोकरी मिळवली.
राणी कुमारी सिंह आणि रिंकी कुमारी सिंह बिहार पोलीस दलात कार्यरत आहेत. रेणू कुमारी सिंह सशस्त्र सीमा बलात, तर सोनी कुमारी सिंह केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) सेवा देत आहेत. प्रीती कुमारी सिंह क्राइम ब्रँचमध्ये, पिंकी कुमारी सिंह उत्पादन शुल्क पोलीस विभागात, तर नन्हीं सिंह रेल्वे पोलीस दलात (GRP) कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.
मुलींना घडवण्यासाठी कमल सिंह यांनी आटाचक्कीच्या माध्यमातून आयुष्यभर कष्ट केले. आजही ते एकमा बाजारातील ब्लॉक रोडवरील आपली आटाचक्की चालवतात. मुलींनी अनेकदा त्यांना हा व्यवसाय बंद करण्यास सांगितले; मात्र, ज्या व्यवसायाच्या कमाईतून मुलींना शिक्षण देता आले, तो व्यवसाय सोडण्याची त्यांची इच्छा नाही.
सातही बहिणींनी मिळून वडिलांसाठी चार मजली इमारत बांधून दिली आहे. भविष्यात मुली आपापल्या सासरी गेल्यानंतर या इमारतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आधार वडिलांना मिळावा, असा त्यामागचा विचार आहे. मुलींनी या भेटीला वडिलांची 'पेन्शन' असे म्हटले आहे.
आई शारदा देवी यांनाही मुलींच्या यशाचा अभिमान आहे. सात मुलींचे संगोपन करताना आलेल्या अडचणींची आठवण त्यांना होते; मात्र आज मुलींनी मिळवलेले यश पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. समाजाचे टोमणे, आर्थिक अडचणी आणि संघर्ष यांवर मात करत उभ्या राहिलेल्या या सात बहिणींची कहाणी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते. एका वडिलांचा विश्वास आणि सात मुलींची जिद्द मिळून कुटुंबाचे आयुष्य कसे बदलू शकते, याचे 'सिंह सिस्टर्स' हे प्रेरणादायी उदाहरण आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.