<div class="paragraphs"><p>Bill Gates&nbsp;</p></div>

Bill Gates 

 

Sarkarnama

देश

ओमिक्रॉन प्रत्येक घरात धडकणार! बिल गेट्स यांचा जगाला धोक्याचा इशारा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने आता डोके वर काढलं आहे. जगभरात ओमिक्रॉन अतिशय वेगाने पसरू लागला आहे. याचवेळी भारतातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना जगाला ओमिक्रॉनबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.

बिल गेट्स यांनी म्हटले आहे की, जगभरात ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग चिंताजनक आहे. यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नाताळच्या पार्श्वभूमीवर माझी पूर्वनियोजित सहलही मी अखेर रद्द केली आहे. माझ्या जवळच्या मित्रांना विषाणूची बाधा झाली आहे. आता कुठे आपले आयुष्य रुळावर आले होते. परंतु, लगेचच आपण कोरोना महामारीच्या सर्वांत वाईट कालखंडात प्रवेश करीत आहोत. प्रत्येकाच्या घरात ओमिक्रॉन धडकणार आहे.

ओमिक्रॉन हा अतिशय वेगाने पसरत आहे. विषाणूंच्या इतिहासात आतापर्यंत एवढ्या वेगाने कोणत्याही विषाणूचा प्रसार झाला नव्हता. तो लवकरच प्रत्येक देशात पोचेल. ओमिक्रॉनमुळे तुमच्या शरीरावर किती परिणाम होतो, हे अद्याप समोर आलेले नाही. आतापर्यंत तो सर्वांत संसर्गजन्य असल्याचे समोर आले आहे, असे गेट्स यांनी स्पष्ट केले आहे.

डेल्टाच्या जागी आता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे तिसरी लाट (Third Wave) पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, असा अंदाज आहे. ओमिक्रॉन हा अतिशय वेगाने संसर्ग होणारा आहे. यामुळे केंद्रासह राज्यांच्या आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत. केंद्र सरकार यामुळे खडबडून जागे झाले आहे. पंतप्रधान मोदींना यासाठी तातडीने आढावा बैठक बोलावली आहे. ही बैठक उद्या (ता.23) होणार आहे. या बैठकीत केंद्र सरकार संसर्ग रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशातील ओमिक्रॉन रुग्णसंख्या 213 झाली आहे. यात दिल्लीत सर्वाधिक रुग्ण 57 आहेत. यानंतर महाराष्ट्र 54, तेलंगण 24, कर्नाटक 19, राजस्थान 18, केरळ 15 आणि गुजरात 14 अशी रुग्णसंख्या आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 6 हजार 317 नवीन रुग्ण सापडले. देशातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची 3.48 कोटी आहे. सध्या सक्रिय रुग्ण 78 हजार 190 आहे. मागील 24 तासांत कोरोनामुळे 318 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 4.78 लाख नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT