<div class="paragraphs"><p>BJP&nbsp;</p></div>

BJP 

 

Sarkarnama

देश

राज्यात सत्तेत आल्यानंतर 50 रुपयांत दारू देणार! भाजप प्रदेशाध्यक्षांची मोठी घोषणा

सरकारनामा ब्युरो

अमरावती : राज्यात सत्तेत येण्यासाठी राजकीय पक्ष मोठमोठी आश्वासने देत असतात. अनेक वेळा जनतेच्या आकलनापलिकडची आश्वासनेही दिली जातात. आता भाजप (BJP) प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील सगळ्या तळीरामांना खूष करणारी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राज्यात सत्तेत आल्यानंतर स्वस्तात दारू (Liquor) देण्याचे आश्वासन देऊन राज्यात खळबळ उडवून दिली आहे.

आंध्र प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी हे आश्वासन दिले आहे. पक्ष सत्तेत आल्यास दारू 75 रुपयांत उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. सरकारचा महसूल वाढल्यानंतर ही किंमत 50 रुपयांवर आणण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे आश्वासन खासगीत दिले नसून विजयवाडा येथे आयोजित जाहीर सभेत दिले आहे. त्यांच्या या मोठ्या घोषणेची राज्यभरात चर्चा होत आहे.

राज्यात खराब दर्जाची दारू जास्त किमतीने विकली जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा हात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. राज्यात 2024 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधीच भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपकडून अनेक पक्षांतील नेत्यांना फोडण्याचे काम सुरू आहे. यातच आता प्रदेशाध्यक्षांनी राज्यात भाजपला 1 कोटी मते मिळून पक्ष सत्तेत आल्यानंतर दारू स्वस्त करण्याचे मोठे आश्वासन राज्यातील जनतेला दिले आहे.

आंध्र प्रदेश सरकारने नुकताच भारतात उत्पादित होत असलेल्या विदेशी दारूवरील अतिरिक्त शुल्क 15 ते 20 टक्क्याने कमी केले आहे. यामुळे राज्यात दारूची किंमत कमी झाली होती. मात्र, सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेला लॉकडाऊन उठवल्यानंतर दारूची किंमत तब्बल 75 टक्क्यांनी वाढवली होती. राज्यातील दारू पिण्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सरकारने त्यावेळी हे पाऊल उचलले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT