PM Narendra Modi, Yogi Adityanath, Amit Shah
PM Narendra Modi, Yogi Adityanath, Amit Shah Sarkarnama
देश

भाजपचं ठरलं! योगी नव्हे तर अमित शहांच्या हाती उत्तर प्रदेशची सूत्र

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : देशातील ५ राज्यांच्या निवडणुकांच्या मैदानात उत्तर प्रदेशाच्या रणधुमाळीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारतोफा २३ जानेवारीपासून धडाडणार आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) व अन्य नेते जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, रोड शो अशा विविध मार्गांनी राज्यात तुफानी प्रचार सुरू करणार आहेत. अलीकडेच उत्तर प्रदेशमध्ये काही भाजपच्या मंत्री व आमदारांनी भाजपला रामराम केल्यामुळे बरीच खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचाराची मुख्य सूत्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याऐवजी आता दिल्लीच्या हाती राहतील हेही यातून स्पष्ट झाले आहे. मोदी व शहांकडे सारी प्रचारसूत्रे असल्याने भाजप ३०० च्या वर जागा नक्की मिळवणार असा विश्वास पक्षाच्या दिल्ली वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्याच वेळी पंजाब व गोव्यासह अन्य राज्यांच्या प्रचार मोहीमांची काटेकोर आखणीही भाजप नेतृत्वाने केली आहे.

निवडणूक आयोगाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असलेल्या राज्यांमध्ये जाहीर सभा, रोड शो यावर बंदी घातली आहे. आधी १५ जानेवारी व नंतर २२ जानेवारीपर्यंत ही बंदी वाढवली आहे. त्यानंतर मात्र आयोगाची बंदी राहणार नाही हेही भाजप नेत्यांच्या निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेतून दिसून येते. या बंदीतून भाजप मंत्री-आमदारांना वगळण्यात येत असल्याचा व त्यांच्या गर्दी जमविण्याकडे आयोग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी केला आहे. मात्र ही त्यांची निराश मानसिकता आहे, असा टोला भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने लगावला आहे.

पत्रकारांशी अनौपचारीकपणे बोलताना या नेत्याने सध्याच्या डिजीटल प्रचारातही भाजपने मोठी आघाडी घेतल्याचे सांगितले. "कॅच देम यंग" या ट‌ॅगलाईनखाली ओबीसी, दलित, जाट या मतपेढ्यांतील महिला व विशेषतः पहिल्यांदा मतदान करणारे युवक यांच्यावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे या नेत्याने नमूद केले. उत्तर प्रदेशातील प्रमुख लढाई भाजप व सपा यांच्यातच असल्याचे मान्य करताना या भाजप नेत्याने मायावती यांची बसपा, प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस व एएमआयएमचे असदुद्दिन ओवैसी हे भाजपच्या दृष्टीने रिंगणात नसलेले खेळाडू आहेत असेही हसतहसत सांगितले.

भाजप सोडून जाणारे स्वामीप्रसाद मौर्य व इतरांमुळे भाजपला काहीही नुकसान होणार नाही, झालाच तर फायदा होईल, उलट मौर्य व इतरांना त्यांचे मतदार विचारतील की भाजप इतका वाईट पक्ष आहे हे पावणेपाच वर्षे सत्ता उपभोगल्यावर तुम्हाला कसे समजले, असा दावा या नेत्याने केला व राजीनामे देणाऱ्या नेत्यांच्या राजीनामा पत्राची भाषा व दलित-शोषित पिछडे यासारख्या ओळी म्हणजे निव्वळ कट-पेस्ट कारागिरी असल्याचा टोमणा त्यांनी मारला. भाजप एका घरात एकालाच तिकीट हे धोरण सक्तीने राबवीत असल्याचे सांगून त्यांनी इच्छुकांना मेसेज दिला.

दरम्यान, अमित शहा यापुढे पंजाबसह इतर राज्यांसोबतच उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त वेळ देतील असे या नेत्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की २०१४ पासून उत्तर प्रदेशातील भाजप संघटना शहांइतकी अन्य कोणत्याही भाजप नेत्याला माहिती नाही. पुढच्या टप्प्यातील प्रचाराची रणनीती ठरविणे, राज्याच्या आठही विभागांतील बूथ पातळीवर कार्यकर्त्यांशी व प्रमुख नेत्यांशी थेट संपर्क ठेवणे, धोक्याच्या जागांवर लक्ष केंद्रित करणे, विरोधकांना नामोहरम करण्यासाठीच्या उपाययोजना दिल्लीतून अंमलात आणणे व हे करताना जाहीर सभा- रोड शो करणे अशा बहुअंगी कार्यपध्दतीने शहा राज्य पिंजून काढणार आहेत.

ओबीसी-दलित समीकरण भाजपच्या बाजूने तेवढाच कौल देईल याची तजवीज करणे व पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट मतदारही भाजपकडे पुन्हा वळल्याची खात्री करून घेणे या दोन आघाड्यांवर भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्व काम करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT