BJP Gen-Z Strategy | Yuva Samvad Campaign Sarkarnama
देश

BJP Gen-Z Strategy : राहुल गांधींची 'छात्रों की गूंज' सुरू असतानाच भाजपचा Gen-Z साठी मास्टरप्लॅन! पक्षाच्या बैठकीत 'त्या' 10 मुद्द्यांच्या ठरावाला मंजुरी

Yuva Samvad Campaign : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी शनिवारी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय टीमसोबत पहिली बैठक घेतली. या बैठकीत संघटन मजबूत करण्यासोबतच आगामी निवडणुका आणि युवा मतदारांपर्यंत पक्षाची पोहोच वाढवण्याबाबत चर्चा झाली आहे.

Jagdish Patil

Navi Delhi, News 23 Aug : देशाच्या राजकारणात सध्या Gen-Z अर्थात नव्या पिढीतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. तरुण मतदारांच्या बदलत्या अपेक्षा, प्रश्न आणि राजकीय भूमिका लक्षात घेऊन त्यांना आकर्षित करण्यासाठी पक्षांकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडिया, थेट संवाद, युवा कार्यक्रम आणि त्यांच्या प्रश्नांवर चर्चा याच्या माध्यमातून तरुणांशी कनेक्ट होण्याची रणनीती आखली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भाजपनेही Gen-Z मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाने Gen-Z शी संवाद वाढवण्यासाठी युवा संवाद पथकाची स्थापना केली आहे. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, सरचिटणीस विनोद तावडे, स्मृती इराणी, गुजरातचे मंत्री हर्ष संघवी आणि छत्तीसगडचे मंत्री ओ. पी. चौधरी यांचा समावेश करण्यात आला आहे.

भाजपची ‘युवा संवाद’ मोहीम

या पथकाच्या माध्यमातून भाजपकडून Gen-Z च्या अपेक्षा, समस्या आणि भविष्यासंदर्भातील विचार समजून घेण्यासोबतच त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल. यासाठी विशेषतः १४ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘युवा संवाद’ अभियानाची तयारी भाजपने केली आहे. या माध्यमातून तरुणांना केवळ पक्षाची भूमिका सांगण्याऐवजी त्यांचे प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेण्यावरही भर दिला जाणार आहे.

नितीन नवीन यांच्या बैठकीत मोठे निर्णय

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी शनिवारी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय टीमसोबत पहिली बैठक घेतली. या बैठकीत संघटन मजबूत करण्यासोबतच आगामी निवडणुका आणि युवा मतदारांपर्यंत पक्षाची पोहोच वाढवण्याबाबत चर्चा झाली. याच बैठकीत Gen-Z शी संवाद साधण्यासाठी विशेष पथकाच्या माध्यमातून पुढील कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘वंदे मातरम्’वरही भाजपचा दहा कलमी ठराव

या बैठकीत ‘वंदे मातरम्’च्या संदर्भात दहा कलमी ठरावालाही मंजुरी देण्यात आली. काँग्रेस कार्यसमितीने १९३७ च्या ठरावाचा पुनरुच्चार करत पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’च्या केवळ दोन कडव्यांचे गायन करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने यावर आक्षेप घेतला आहे. ‘वंदे मातरम्’चा इतिहास, अर्थ आणि स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्व तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचा भाजपचा मानस आहे. नव्या पिढीशी जोडण्यासाठी राष्ट्रवाद आणि ऐतिहासिक वारशाच्या मुद्द्यालाही या अभियानात स्थान दिले जाणार आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर Gen-Z महत्त्वाचा

भाजपच्या या रणनीतीमागे आगामी विधानसभा निवडणुकांचाही मोठा संदर्भ आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये युवा मतदारांची संख्या मोठी असल्याने Gen-Z पर्यंत पोहोचणे राजकीय पक्षांसाठी निर्णायक ठरू शकते. त्यामुळे भाजपने संघटनात्मक ताकदीसोबतच नव्या पिढीच्या मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. त्यामुळे एकीकडे 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतानाच भाजपने जेन-शी पर्यंत पोहोचण्याचा मास्टर प्लॅन तयार केल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT