Narendra Modi, Ravindra Jadeja
Narendra Modi, Ravindra Jadeja Sarkarnama
देश

दिग्गजांना धक्का देत भाजपने रवींद्र जडेजाच्या पत्नीला उतरवले मैदानात

सरकारनामा ब्यूरो

Gujarat Election : भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या पत्नीला भाजपने (BJP) गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Election) उतरवले आहे. रवींद्र जडेजा यांच्या पत्नी रिवाबा यांचा या निमित्ताने राजकारणात प्रवेश झाला आहे. विशेष म्हणजे भाजपने विद्यमान आमदारांचे तिकीट कापून रिवाबा यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गुरुवारी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये 182 विधानसभा जागांपैकी 160 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या सात उमेदवारांना भाजपने तिकीट दिले आहे.

गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्ता असलेल्या भाजपने माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारत मोठा धक्का दिला आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये रिवाबा जडेजा यांचा समावेश आहे, ज्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. जामनगर उत्तर या मतदारसंघातून रिवाबा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

त्यामुळे साहजिकच पत्नीसाठी खुद्द रवींद्र जडेजाही भाजपचा प्रचार करताना आगामी काळात दिसण्याची शक्यता आहे. रिवाबा मेकॅनिकल इंजिनिअर आहेत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिसिंह सोलंकी यांच्या नातेवाईक आहेत. 2016 मध्ये त्यांचे लग्न रवींद्र जडेजासोबत झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थितीत होते. या बैठकीनंतर भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहिर झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून सातत्याने भाजपची सत्ता आहे. या वेळी गुजरातमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे, कारण भाजपशिवाय, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस, आम आदमी पार्टी देखील जोरदार प्रचारात उतरली आहे. दरम्यान, गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला 89 जागांसाठी आणि 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT