BJP leader Amit Shah walks on Chennai road to greet supporters
BJP leader Amit Shah walks on Chennai road to greet supporters  
देश

प्रोटोकॉल तोडून अमित शहा मोटारीतून उतरले अन् पायीच चालू लागले...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाने आता तमिळनाडूकडे लक्ष वळविले दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेची सुरुवात केली आहे. तमिळनाडूतील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज चेन्नईत दाखल झाले. चेन्नईत आगमन होताच शहा यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ते प्रोटोकॉल तोडून मोटारीतून खाली उतरले आणि विमानतळाबाहेरील वर्दळीच्या जीएसटी रोडवर कार्यकर्त्यांना अभिवादन करीत चालू लागले. 

शहा यांनी नुकताच पश्चिम बंगालचा दौरा केला होता. शहांच्या दौऱ्यानंतर बंगालमधील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. शहा यांच्या तमिळनाडू दौऱ्यामुळे सर्वच प्रादेशिक पक्ष सावध भूमिका घेत आहेत. विकास योजनांच्या उद्गाटनासाठी असलेल्या दौऱ्याची माहिती देताना स्वतः शहा यांनी, संघटनात्मक कामासाठी आपण चेन्नईला पोहोचलो असे ट्‌विटरवर जाहीर केले आहे. 

शहांचे स्वागत मुख्यमंत्री के.पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम, वरिष्ठ मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरूगन यांनी केले. विमानतळाबाहेर पडताच अतिशय रहदारीच्या जीएसटी रोडवर प्रोटोकॉल तोडून शहा मोटारीतून खाली उतरले. सकाळपासून शहांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत रस्त्यावर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन करीत त्यांनी पायी जाण्यास सुरुवात केली. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शहा यांनी या वेळी चेन्नई आणि तमिळनाडूबद्दल प्रेमही व्यक्त केले. 

शहा हे या दौऱ्यात माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचे पुत्र एम. अळगिरी यांच्याशी चर्चा करणार आहेत. एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकमध्ये अळगिरी यांना अडगळीत टाकण्यात आले आहे. ते लवकरच द्रमुक के (कलैग्नार) या नव्या पक्षाची स्थापना करणार आहेत. त्यांच्या या पक्षाशी युती करण्याच्या दृष्टीने शहा-अळगिरींबरोबर चर्चा करतील, असे सांगण्यात येते.  

अळगिरी यांच्याशी युती झाली तर भाजपला त्याचा कितपत फायदा होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, द्रमुकला याचा नक्कीच फटका बसेल. द्रमुकला फटका बसल्यास याचा थेट फायदा अण्णाद्रमुकला होईल. याचबरोबर भाजपच्याही मतटक्‍क्‍यातही काहीशी वाढ होऊ शकेल. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकचे भाजपशी चांगले संबंध होते.  मात्र, मागील काही काळापासून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. 

केवळ नाईलाजाने अण्णाद्रमुक पक्ष केंद्रात भाजपबरोबर असल्याचे चित्र आहे. भाजपच्या वेल यात्रेवरून अण्णाद्रमुकच्या नेत्यांतील मतभेद समोर आले होते. ओ. पनीरसेल्वम यांच्या बंडखोरीमागे भाजपचे केंद्रीय नेतृत्व असल्याचे दिसले होते. भाजपच्या वेल यात्रेला दोन्ही द्रविडी पक्षांचा तीव्र विरोध आहे. कोरोनाचे निमित्त करून अण्णाद्रमुक सरकारने यात्रेवर बंदी घातली व अनेक भाजप नेत्यांना अटक केली तरी तरी भाजपने यात्रा पुढे रेटली असून, 6 डिसेंबरला या यात्रेच्या समारोपानिमित्त मोठा मेळावा घेण्याची भाजपची तयारी आहे. शहा आजच्या तमिळनाडू दौऱ्यात यासंदर्भातही चाचपणी करणार आहेत.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT