Mamata Banerjee
Mamata Banerjee  Sarkarnama
देश

मुंबई दौऱ्यामुळे ममता अडचणीत; भाजप नेत्यांची पोलिसांकडे धाव

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या मुंबई दौऱ्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रगीत अर्धवट म्हटल्याचा मुद्दा भाजपने उपस्थित केला आहे. भाजप (BJP) नेत्यांनी त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारही केली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ममतांच्या विरोधात खटला दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.

ममता बॅनर्जी यांनी काल (ता.1) मुंबईत माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी उठून स्वत: राष्ट्रगीत म्हटले होते. आता भाजपने हे राष्ट्रगीत अर्धवट म्हटल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. ममतांच्या दौऱ्यावरून आधीच टीका करीत असलेल्या भाजपला आता ही संधी मिळाल्याचे मानले जात आहे. राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी ममतांच्या विरोधात भाजप नेत्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून, तक्रारही दाखल केली आहे.

मुंबई भाजपचे सरचिटणीस विवेकानंद गुप्ता यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनीच ट्विटरवर याची माहिती दिली आहे. दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ममतांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, दीदी अर्धवट राष्ट्रगीत म्हणणे हा अर्धवटपणा आणि राष्ट्रगीताचा अपमान आहे. हा अपमान केल्याबद्दल मी तुमच्यावर खटला दाखल करणार हे नक्की...राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात मी आज 11.30 वाजता दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे.

ममता बॅनर्जी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाच्‍या दृष्‍टीने ममतांनी पवारांची भेट घेणे महत्‍वाची मानले जात आहे. या भेटीनंतर ममतांनी काँग्रेस वगळून तिसऱ्या आघाडीचे सूतोवाच केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ममतांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. पण त्यांचे पुत्र व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांची भेट झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT