Vinod Tawde
Vinod Tawde Sarkarnama
देश

तावडेंवर मोठी जबाबदारी! नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी तातडीनं रवाना

सरकारनामा ब्युरो

आगरतळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव (Biplab Kumar Deb) यांनी तडकाफडकी राजीनामा आज दिला. भाजपने (BJP) मुदत संपण्याआधीच देव यांना पदावरून हटवलं आहे. नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी आज सायंकाळी विधिमंडळ पक्षाची बैठक होत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर केंद्रीय निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळं नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी तावडे हे आगरतळात दाखल झाले आहेत.

त्रिपुरात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होत आहे. निवडणुकीला सुमारे वर्षभराचा कालावधी असतानाच मुख्यमंत्रिपदावरून देव यांना हटवण्यात आला आहे. राज्यातील भाजपमध्ये गटबाजी उफाळून आल्यानं पक्ष नेतृत्वानं हे पाऊल उचललं आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी देव यांना दिल्लीला पाचारण करण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. त्याचवेळी देव यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.

त्रिपुरात सत्तेत आल्यानंतर देव यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आज त्यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून विनोद तावडे आणि भूपेंद्रकुमार यादव राज्यात दाखल झाले आहेत. आज सायंकाळी पक्षाच्या आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांची निवड आजच केली जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर पक्षाने देव यांना डच्चू दिल्याचे मानले जात आहे.

देव यांनी राज्यपाल एस.एन.आर्य यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. राजीनामा दिल्यानंतर बोलताना त्यांनी पक्षाने संघटनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी दिल्याचं सांगितलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्रिपुराचे (Tripura) माजी आरोग्य मंत्री सुदीप रॉय बर्मन आणि आशिष कुमार साहा यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपलाही रामराम ठोकला होता. त्यानंतर दोघांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामुळं भाजपला लागलेली गळतीही नेतृत्वासाठी डोकेदुखी ठरली होती. आता गटबाजी रोखण्यासाठी मुख्यमंत्री बदलाचा निर्णय अखेर घेण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT