amit shah-mamta banerjee Sarkarnama
देश

पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं; भाजपने केली राष्ट्रपती राजवटीची मागणी...

BJP|Amit Shah|mamta banerjee : भाजप प्रदेशाध्यक्ष सुकान्त मजूमदार यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळानेही गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली.

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या (West Bengal) बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट येथे परस्पर वैमनस्यातून 8 लोकांना जिवंत जाळून मारल्याची घटना गंभीर असून याचे राजकीयीकरण केले जात नाही व केंद्र सरकार (Central Government) तसे होऊ देणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी तृणमूल कॅाग्रेसच्या (Trinamool Congress) संसदीय शिष्टमंडळाला आज (ता. 24 मार्च) सांगितले. हा मुद्दा चांगलाच तापला असून भाजपने (BJP) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे. या घटनेने साऱ्या देशाची मान खाली गेल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

बीरभूम हिंसाचारावरून आज तृणमूल व भाजप खासदारांनी गृहमंत्री शहांची भेट घेतली. तृणमूल शिष्टमंडळाने राज्यपाल जगदीप धनकड यांची या घटनेनंतरची प्रक्षोभक विधाने लोकशाहीसाठी मारक असून त्यांना माघारी बोलवावे अन्यथा राज्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती चिघळेल, असे सांगितले. शहांनी या घटनेचा राजकारणासाठी वापर होत नसल्याचे त्यांना सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष सुकान्त मजूमदार यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळानेही शहा यांची भेट घेऊन पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली. या मुद्यावर राज्य सरकारने 72 तासांत सविस्तर अहवाल केंद्राला पाठवावा, असे निर्देश शहा यांनी दिल्याचे मुजूमदार म्हणाले. ज्येष्ठ भाजप नेते दिलीप घोष यांनी पत्रकारांना सांगितले की, भाजप खासदारांनी गृहमंत्र्यांना राज्यातील भयानक कायदा सुव्यवस्था परिस्थितीबाबत स्पष्ट कल्पना दिल्यावर तृणमूल खासदार सारवासारव करण्यासाठी त्यांना भेटले. राज्यातील परिस्थिती इतकी आटोक्याबाहेर झाल्याचे उघड दिसत असताना हे गृहमंत्र्यांना काय समजावून सांगणार. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून केंद्राने आता हस्तक्षेप करण्यावाचून गत्यंतर नाही, असे भाजपने शहा यांच्या लक्षात आणून दिले आहे.

महिला, बालकांसह 8 लोकांना आधी निर्घृण मारहाण केली जाते व नंतर त्यांना जिवंत जाळून मारले जाते. इतकी भीषण घटना घडूनही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घटनास्थळी जाण्यासाठी चार दिवस लागतात हा काय प्रकार आहे. ममता यांना इतक्या उशीरा जाग येणे हाच राज्य सरकारच्या अपयशाचा पुरावा आहे. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आता राज्यपालांवर आरोप केले जात आहेत. ते तृणमूल सरकार व नेत्यांनी त्वरित थांबवावे, अशी टीका मुजूमदार यांनी ममता सरकारवर केली.

फक्त नावातच ममता...

भाजपने या प्रकरणी ममता बॅनर्जी सरकारवर आक्रमक हल्ल चढविण्यास सुरवात केली असून यापुढे दररोज भाजप नेते प्रवक्ते यावरून दिल्लीत वातावरण तापवणार हे स्पष्ट आहे. बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे फक्त नावच ममता आहे. प्रत्यक्षात त्यांच्या मनात ममतेचा अंशही नाही. त्यांचे काम निर्मम (निष्ठूर) आहे. त्यांचे खरे नाव निर्मम बॅनर्जी असायला हवे असा हल्ला भाजपचे पक्ष प्रवक्ते संबीत पात्रा यांनी चढविला. हा एका राज्याचा नव्हे तर साऱ्या देशाचा मुद्दा असल्याचे सांगून पात्रा म्हणाले की, पंतप्रधानांनीही काल याबद्दल तीव्र खेद व्यक्त करताना या घटनेने त्यांनाही धक्का बसल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT