Goa Assembly Sarkarnama
देश

काँग्रेसला धक्का! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने मारली बाजी

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला हरवून भाजपने बाजी मारली आहे.

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात भाजपने (BJP) सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता भाजपने काँग्रेसला (Congress) आणखी एक धक्का दिला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे रमेश तवडकर (Rames Tawadkar) हे निवडून आले असून, त्यांनी काँग्रेसचे अलेक्सिओ सिक्वेरा यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे हेच तवडकर अपक्ष म्हणून लढून मागील निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरले होते.

तवडकर हे भाजपच्या जुन्या फळीतील नेते आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सरकारमध्ये ते क्रीडामंत्री होते. ते शालेय शिक्षक असून, त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. विशेष 2017 च्या विधानसभा निवडणुकीत तवडकर यांना भाजपने तिकीट नाकारले होते. त्यामुळे ते काणकोण मतदारसंघातून अपक्ष लढले होते. यामुळे तेथून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. नंतर 2019 मध्ये ते भाजपमध्ये परतले होते. आता ते पुन्हा ते काणकोण मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने नुवेचे आमदार अलेक्सिओ सिक्वेरा यांना मैदानात उतरवले होते. तवडकर यांनी सिक्वेरा यांचा पराभव केला. तवडकर यांना 24 तर सिक्वेरा यांना 15 मते मिळाली.

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या गळ्यात टाकली आहे. सावंत यांच्यासोबत 8 मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. यात विश्वजीत राणे (Vishwajit Rane), मॉविन गुदिन्हो, रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र भाजपकडून यात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. गोव्याच्या मंत्रिमंडळाची क्षमता 11 आहे. मंत्रिमंडळात अजून 3 जागा शिल्लक आहेत. यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) आणि अपक्षांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मगोपच्या सुदिन ढवळीकरांसह अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

भाजपने गोव्यात 20 जागा मिळवत पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. असे असले तरी मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाला होता. काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना डच्चू मिळण्याची चर्चा सुरू होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट त्यांनी घेतली अन् मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा एकदा सावंत यांच्या गळ्यात टाकण्याचा निर्णय भाजपने घेतला. साखळी मतदारसंघातून सावंत यांचा केवळ 666 मतांनी विजय झाला आहे. सावंत यांच्या खराब कामगिरीमुळे पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळे सावंतांची विकेट पडून मुख्यमंत्रिपदासाठी दुसरे नाव पुढे केले जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. पण पक्ष नेतृत्वाने सावंत यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT