Subhash Phal Dessai resigns as Deputy Speaker of Goa Legislative Assembly Sarkarnama
देश

सुभाष फळदेसाई यांचा विधानसभेच्या उपसभापतीपदाचा राजीनामा

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी झाला आहे. त्यानंतर काही दिवसांतच विस्तार होत आहे.

सरकारनामा ब्युरो

पणजी : भाजपचे (BJP) गोव्यातील सांगे विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष फळदेसाई (Subhash Phal Dessai) यांनी शनिवारी विधानसभेच्या (Assembly) उपसभापतीचा राजीनामा दिला आहे. त्यांची गोव्याच्या मंत्रिमंडळात (Goa Cabinet) वर्णी लागणार आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या मंत्रिमंडळाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत शपथविधी झाला आहे. त्यानंतर काही दिवसांतच विस्तार होत आहे.

फळदेसाई यांची नुकतीच उपसभापतीपदी निवड झाली होती. पण मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडणार असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. फळदेसाई यांच्यासह महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) आणि भाजपचे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर (Nilkanth Halarnkar) यांचे मंत्रिपद निश्‍चित झाले आहे. या तिघांचाही शनिवारीच राजभवनात शपथविधी होण्यार आहे.

प्रमोद सावंत यांनी तेरा दिवसांपूर्वी आठ मंत्र्यांसह शपथ घेतली आहे. आता नव्याने तीन मंत्र्यांचा समावेश होत असल्याने त्यांच्या मंत्रिमंडळात एकूण 11 मंत्री असतील. मंत्रिमंडळामध्ये पोंडा तालुक्यातील सर्व चार आमदारांना संधी मिळाली आहे. चाळीस आमदारांची संख्या असलेल्या विधानसभेत भाजपचे 20 आमदार निवडून आले आहेत. त्यानंतर जादूई आकडा गाठण्यासाठी त्यांनी तीन अपक्ष आमदारांसह मगोपच्या दोन आमदारांनी पाठिंबा दिला आहे.

फळदेसाई हे मुख्यमंत्री सावंत यांचे निकटवर्ती मानले जातात. सावंत हे 2019 मध्ये मुख्यमंत्री बनल्यानंतर फळदेसाई यांना ईएसजीचे उपाध्यक्ष करण्यात आले होते. दरम्यान, भाजपमधील आमदार व कार्यकर्त्यांकडून ढवळीकर यांच्या नावाला विरोध होऊनही त्यांना मंत्रिपद देण्यात आल्याची चर्चा आहे.

मगोपने या निवडणुकीत भाजपची साथ सोडत तृणमूल काँग्रेसशी युती केली होती. जवळपास सहा ते सात मतदारसंघात मगोपने भाजपला कडवी लढत दिली. पण केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. नीळकंठ हळर्णकर हे 2019 मध्ये अन्य नऊ काँग्रेस आमदारांसह भाजपमध्ये आले होते. त्यांनाही मंत्रिपद देण्यात आलं आहे.

गोव्यात भाजपने सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्या गळ्यात टाकली आहे. सावंत यांच्यासह 9 मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. यात विश्वजीत राणे (Vishwajit Rane), मॉविन गुदिन्हो, रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांच्या नावाचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT