bjp mp from west bengal mukul roy will join trinamool congress says sources
bjp mp from west bengal mukul roy will join trinamool congress says sources 
देश

भाजप खासदार मुकुल रॉय लवकरच तृणमूलमध्ये? ज्येष्ठ नेत्याने दिले संकेत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) पराभवानंतर राज्यातील भाजपमध्ये (BJP) अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपचे उपाध्यक्ष खासदार मुकुल रॉय (Mukul Roy) यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे. यातच रॉय यांनी पक्षाच्या बैठकीलाही दांडी मारली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मुकुल रॉय यांच्याबद्दल मौन बाळगले असताना तृणमूल काँग्रेसचे (TMC) ज्येष्ठ नेते  खासदार सौगत रॉय (Saugat Roy) यांनी याबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत. 

सौगत राय म्हणाले की, अभिषेक बॅनर्जी यांच्या संपर्कात अनेक नेते असून, त्यांना परत पक्षात यायचे आहे. पक्षाला गरज होती त्यावेळी त्यांनी विश्वासघात केला होता. याबद्दलचा अंतिम निर्णय ममतदीदी घेतील. पक्षात परतणाऱ्या नेत्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक मवाळ आणि दुसरा जहाल आहे. मवाळ नेत्यांनी पक्ष सोडला असला तरी त्यांनी ममतांचा अपमान केला नाही. याचवेळी जहाल नेत्यांनी ममतांना लक्ष्य केले. 

मुकुल रॉय यांनी ममतांवर व्यक्तिगत पातळीवरील टीका करणे टाळले, त्यामुळे त्यांचा समावेश मवाळ नेत्यांमध्ये होतो. याचवेळी सुवेंदू अधिकारी यांनी सातत्याने ममतांना लक्ष्य केले त्यामुळे त्यांचा समावेश जहाल नेत्यांमध्ये होतो. मवाळ नेत्यांसाठी तृणमूलचे दरवाजे खुले आहेत. या पार्श्वभूमीवर तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी मुकुल रॉय यांची घेतलेली भेट महत्वपूर्ण होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी नुकतीच पक्षाची बैठक कोलकत्यात बोलावली होती. या बैठकीला रॉय यांनी दांडी मारली. मागील काही दिवसांपासून रॉय यांनी मौन धारण केले आहे. सार्वजनिकरीत्या त्यांनी कोणतेही विधान केलेले नाही. मात्र, रॉय यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी रॉय हे तृणमूलमध्ये परततील, ही शक्यता नाकारलेली नाही. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपमज्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये मुकुल रॉय यांचा समावेश होता. भाजपचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमधून आलेले अनेक नेते उघडपणे घरवापसीबद्दल बोलू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रॉय हे पुन्हा तृणमूलमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपमध्ये ते बाजूला फेकले गेले असून, ते नाराज असल्याचेही बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे ही चर्चा सुरू झाली आहे.  

मुकुल रॉय यांच्या पत्नी आजारी असून, कोलकत्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी नुकतीच रुग्णालयाला भेट दिली होती. यानंतर भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. नंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच थेट रॉय यांनी दूरध्वनी करुन त्यांच्याशी चर्चा केली होती. मोदी आणि रॉय यांच्यात काही मिनिटे संवाद झाला. रॉय यांच्या पत्नीच्या प्रकृतीबद्दल मोदींनी विचारपूस केली. त्यांच्यात राजकारणाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, अशी भाजपमधील सूत्रांनी दिली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT