BJP MPs Protest  Sarkarnama
देश

भाजपचे खासदार झाले आक्रमक; मैदानात उतरत विरोधकांना दिलं जशास तसं उत्तर

भाजप खासदारांच्या या पवित्र्यामुळे आता जोरदार खडागंजी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : संसदेची हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) सलग पाचव्या दिवशीही वादळी होण्याची शक्यता आहे. राज्यसभेतील (Rajya Sabha) 12 खासदारांना निलंबित करण्याच्या निर्णयावर काँग्रेससह (Congress) विरोधी पक्ष आक्रमक झाले असून निलंबन रद्द करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. या कारवाईविरोधात दररोज संसदेबाहेर आंदोलन केलं जात आहे. आता त्याविरोधात भाजपचे (BJP) खासदारही आक्रमक झाले आहेत.

भाजपच्या राज्यसभेतील खासदारांनी शुक्रवारी सकाळी विरोधी पक्षांच्या भूमिकेविरोधात आंदोलन केलं. खासदारांनी विरोधी पक्षांच्या कृतीचा हातात फलक घेऊन जोरदार निषेध केला. ही लोकशाही नव्हे गुंडगिरी अशा आशयाचे फलक खासदारांनी हातात धरले होते. तसेच मागील अधिवेशनावेळी झालेल्या गोंधळाचे फोटोही फलकावर लावण्यात आले होते. भाजप खासदारांच्या या पवित्र्यामुळे आता राज्यसभेत जोरदार खडागंजी होण्याची शक्यता आहे.

संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून लोकसभा व राज्यसभेत दोन्ही सभागृहांमध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक चर्चेविना पारित झाल्याने विरोधक आक्रमक झाले होते. त्यातच राज्यसभेत 12 खासदारांचे निलंबन केल्यानंतर विरोधकांनी अधिकच आक्रमक पवित्रा घेतला. ही कारवाई मागे घेण्यासाठी विरोधी खासदारांकडून दररोज संसदेच्या आवारातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले जात आहे.

दरम्यान, मागील अधिवेशनात झालेल्या गोंधळातील खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव आधीपासून विचाराधीन होता. विमाविषयक विधेयकाला विरोध करत अनेक सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत घोषणाबाजी केली होती. त्यावेळी सभागृहात सुरक्षारक्षक बोलवण्यात आले होते. त्यावरूनही मोठा गदारोळ निर्माण झाला होता. सुरक्षारक्षक आणि सुरक्षारक्षकांमध्येही झटापट झाली होती. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तर उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी या प्रकारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना त्यांचे डोळेही पाणावले होते.

निलंबित बारा खासदार पुढीलप्रमाणे -

1. प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना)

2. अनिल देसाई (शिवसेना)

3. अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस)

4. सईद नासीर हुसेन (काँग्रेस)

5. राजमनी पटेल (काँग्रेस)

6. रिपून बोरा (काँग्रेस)

7. छाया वर्मा (काँग्रेस)

8. फुलो देवी नेतम (काँग्रेस)

9. शांता छेत्री (टीएमसी)

10. डोला सेन (टीएमसी)

11. एलामराम करीम (सीपीएम)

12. बिनॉय विश्वम (सीपीआय)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT